Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच शाळेची खरी ओळख; शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी कोळपेवाडीत आमदार आशुतोष काळे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

कोपरगाव : "प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असून या टप्प्यात मिळालेले शिक्षण आणि संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात

रावसाहेब शिंदे जीवनगौरव पुरस्कार माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ; कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे प्रतिपादन
आंध्र प्रदेशातील भाजप आमदार ईश्वरा राव नंदुकुडिती यांनी घेतले शनीदेवांचे दर्शन; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून सत्कार
मृत्यूशी झुंजणाऱ्या १५ वर्षे जुन्या वटवृक्षाचे श्रीगोंद्यात यशस्वी पुनर्रोपण; वृक्षप्रेमींचा स्तुत्य उपक्रम

कोपरगाव : “प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असून या टप्प्यात मिळालेले शिक्षण आणि संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित करावी. कोणत्याही शाळेची ओळख केवळ भव्य इमारती, आधुनिक सुविधा किंवा शिक्षकांच्या संख्येवरून होत नसते, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच त्या शाळेची खरी ओळख असते,” असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळपेवाडी येथे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ज्ञानार्जनाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या चिमुकल्यांसाठी शाळेचा पहिला दिवस हा संस्मरणीय क्षण असतो. आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा सुजाण नागरिक झाला पाहिजे, या दृष्टीकोनातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवावे. कोळपेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि टिकून असलेला पट ही अभिमानास्पद बाब असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळेच्या भौतिक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचेही वाटप करण्यात आले.

या सोहळ्याला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक शकील पटेल, सरपंच सौ. चंद्रकलाताई कोळपे, सागर कोळपे, आदिनाथ कोळपे, अनिल कोळपे, महेश कोळपे, नंदकिशोर कोळपे, केंद्रप्रमुख पंडोरे, ग्रामविकास अधिकारी सय्यद यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS