घोडेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात अज्ञात व्यक्तींनी समाजविघातक कृत्य करत तळमजला व पहिल्या मजल्यावरील एकूण १४ खिडक्यांच्या काचा फोडल्याची संतापजन

घोडेगाव : येथील ग्रामीण रुग्णालयात अज्ञात व्यक्तींनी समाजविघातक कृत्य करत तळमजला व पहिल्या मजल्यावरील एकूण १४ खिडक्यांच्या काचा फोडल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच्या दरम्यान घडला असून, घटनास्थळी दगड आढळून आले आहेत.
यापूर्वीही रुग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या, ज्या रुग्णालय प्रशासनाने दुरुस्त केल्या होत्या. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी पुन्हा अशाच प्रकारे काचा फोडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय हे नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी असून अशा कृत्यांमुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याची खंत वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज गुंजाळ यांनी व्यक्त केली आहे. काचा फोडताना एखादा रुग्ण किंवा कर्मचारी जखमी झाला असता, तर गंभीर प्रसंग उद्भवला असता, असे सांगत त्यांनी शेजारील वसाहतीतील पालकांनी आपल्या मुलांना समज द्यावी, असे आवाहन केले आहे. या परिसरात सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रुग्णालय परिसरात भटक्या जनावरांचा वावर आणि कचऱ्याचे साम्राज्य रुग्णालय परिसरात शेळ्या, गायी व भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून पाण्याचे नळ तोडण्याचे प्रकारही घडत आहेत. तसेच काही नागरिक परिसराचा वापर प्रातर्विधीसाठी करत असल्याने अस्वच्छता पसरली आहे. रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नियमितपणे कचरा टाकला जात असल्याने रुग्णांसह नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS