Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये महानगर बँकेची बनावट सोने तारणप्रकरणी 83 लाखाची फसवणूक

गोल्ड व्हॅल्युवरसह 23 जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर/प्रतिनिधी ः शहरातील अनेक बँकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणार्‍या आणि त्या माध्यमातून बनावट सोन्याचे तारण ठेवून कर्जदारांना

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर
संगमनेरमध्ये निसर्गप्रेमी एकवटले
वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ

संगमनेर/प्रतिनिधी ः शहरातील अनेक बँकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता तपासणार्‍या आणि त्या माध्यमातून बनावट सोन्याचे तारण ठेवून कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देणार्‍या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्या माध्यमातून आणखी एका बँकेचे तब्बल 83 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यामुळे येत्या काही दिवसात आणखी काही बँकांमधील घोटाळे समोर येण्याची शक्यता बळावली आहे. या घोटाळ्यांमुळे या बँकांची विश्‍वासार्हतादेखील धोक्यात आली आहे.  मुंबई येथील प्रतिष्ठित असलेल्या जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेची संगमनेरमध्ये शाखा आहे. या बँकेत खोट्या सोन्याचा माध्यमातून 23 कर्जदारांनी बँकेची 82 लाख 57 हजार 834 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात केली. याप्रकरणी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यासह 23 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील आणि या गुन्ह्यातील काही आरोपी तेच-तेच असल्याचे दिसते.
गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्या माध्यमातून यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे 68 लाख, नासिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संगमनेर शाखेत सुमारे सव्वाचार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे यापूर्वीच दाखल झालेले आहेत. त्यात आता आणखी या एका नवीन गुन्ह्याची भर पडली आहे. यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या फसवणूक प्रकरणात शहाणे याच्यासह काही आरोपींना संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. दरम्यान महानगर बँकेचे व्यवस्थापक शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,दि. 1 जुलै 2016 पासून जगदीश शहाणे हा बँकेत गोल्ड व्हॅल्यूअर म्हणून काम पाहत आहे. शहाणे यांनी सोनेतारण करणार्‍या कर्जदारांच्या सोन्याची शुद्धता तपासणी करून त्या संदर्भात ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोनेतारण कर्ज दिले जाते. कर्जदाराकडे सोने खोटे निघाल्यास त्यास गोल्ड व्हॅल्यूअर आणि कर्जदार जबाबदार असतो. दरम्यान गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्या विरोधात सोनेतारण कर्ज प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती माध्यमांमधून बँकेचे व्यवस्थापक शिंदे यांना समजली होती. त्यामुळे शिंदे यांनी याची माहिती तातडीने आपल्या बँकेच्या मुख्य शाखेला दिली. बँकेच्या व्यवस्थापनाने गोल्ड व्हॅल्यूअर शहाणे याच्यासह सोनेतारण कर्जदारांना नोटीसा पाठवून दागिन्यांची तपासणी करण्यासाठी बँकेत हजर राहण्यास कळविले होते. या तपासणीमध्ये 23 कर्जदारांचे सोने बनावट असल्याचे आढळून आले. या कर्जदारांनी बँकेची 82 लाख 57 हजार 834 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

जी.एस.महानगर बँकेची फसवणूक करणारे आरोपी- जी.एस.महानगर बँकेची बनावट सोने तारण प्रकरणी फसवणूक करणार्‍या आरोपीमध्ये गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. एकता चौक मालदाड रोड, ता. संगमनेर), राजेश केशवराव नेवासकर (रा. गणेशनगर ता. संगमनेर), शशिकला विश्‍वनाथ पवार (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), शरद मारुती पर्बत ( रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर), महेश रामचंद्र जोशी (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), मुकुंद मुरलीधर उपरे (रा. साळीवाडा, ता. संगमनेर), योगेश शंकर सुर्यवंशी (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर), संदिप नंदलाल काळंगे (रा. इंदिरानगर ता. संगमनेर), आयुब उस्मान पठाण (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) नवनाथ भरत घोडेकर (रा. घोडेकरमळा ता.संगमनेर), नाजीम अब्दुलमान शेख (रा. मोगलपुरा, ता. संगमनेर), रविंद्र रमेश राजगुरू (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) सचिन मनलभाऊ होलम (रा. सय्यदबाबा चौक ता. संगमनेर), अनिल राजाराम पावबाके (रा. पावबाकी रोड, ता. संगमनेर) ज्ञानेश्‍वर त्रंबक पगारे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), राजेंद्र काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) प्रतिक नानासाहेब केरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर), विजय भास्कर अवचिते (रा. पावबाकी रोड, ता. संगमनेर), रामभाऊ भावका पुणेकर (रा. डीग्रस, ता. संगमनेर), विशाल काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), उषा शिवाजी दुधवडे (रा. सावरगावतळ, ता. संगमनेर), वैभव प्रकाश वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), राजेश विश्‍वनाथ पवार (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) या आरोपींचा समावेश आहे.

COMMENTS