कोलकाता : पश्चिम बंगालमधील कथित शालेय भरती गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात 'ईडी'न
कोलकाता : पश्चिम बंगालमधील कथित शालेय भरती गैरव्यवहार प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ‘ईडी’ने (ED) चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार ते कोलकाता येथील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित झाले.
या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण संस्था (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या दोषारोपपत्रांमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचे नाव नमूद करण्यात आल्याचे सांगितले जाते. शालेय नोकरी भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप या प्रकरणाशी संबंधित आहे. या कथित गैरव्यवहाराचा तपास गेल्या काही वर्षांपासून सुरू असून यापूर्वी राज्यातील काही माजी मंत्री आणि अधिकारी यांच्यावरही कारवाई झाली आहे.
आमदारांच्या कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणातही अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील तपास सुरू आहे. या प्रकरणात राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) त्यांची अलीकडेच सुमारे आठ तास चौकशी केली होती. या तपासाच्या पुढील टप्प्यात त्यांना पुन्हा १६ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्यातील त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी शोधमोहीम राबविली होती. पोलीस पथकाने केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या उपस्थितीत घराची तपासणी केली. ही कारवाई अनेक तास सुरू होती. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एका निकटवर्तीय व्यक्तीचा शोध घेण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली होती.

COMMENTS