कर्जत : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस बंदी असलेल्या प्रतिबंधित औषधी इंजेक्शनच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी मिरजगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आ

कर्जत : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस बंदी असलेल्या प्रतिबंधित औषधी इंजेक्शनच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी मिरजगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत ५८ हजार ६४० रुपये किमतीची एकूण ७७ प्रतिबंधित इंजेक्शने जप्त करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी सध्या फरार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत मिरजगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना, बाभूळगाव खालसा येथील प्रविण ऊर्फ पप्पू लाला भोसले याने प्रतिबंधित औषधी इंजेक्शने विक्रीसाठी रोहन भाऊसाहेब लाढाणे (वय २२) याच्याकडे पाठविल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी बाभूळगाव खालसा येथील महामार्गावरील पुलाखाली सापळा रचून संशयास्पदरीत्या थांबलेल्या रोहन लाढाणे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शने आढळून आली. चौकशीत या इंजेक्शन्सचा काही व्यक्तींकडून व्यसनासाठी, तसेच जिम व व्यायामशाळांमध्ये कृत्रिमरीत्या शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी (स्टेरॉइड्स म्हणून) गैरवापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी प्रविण भोसले याच्या घराची झडती घेऊन तेथून आणखी ७६ इंजेक्शने जप्त केली.
या प्रकरणी रोहन लाढाणे आणि प्रविण भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार प्रविण भोसले याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड करीत आहेत. तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या अशा बेकायदेशीर औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा मिरजगाव पोलिसांनी दिला आहे.

COMMENTS