सोनई : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील झापवाडी शिवारातील मनिषा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन युवकांना लोखंडी को
सोनई : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील झापवाडी शिवारातील मनिषा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन युवकांना लोखंडी कोयत्याने व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात एका नामनिर्देशित कामगारासह त्याच्या अन्य अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वास नंदू डोळसे (वय १७) व वैभव छगन लोंढे (वय २२, दोघे रा. घोडेगाव) हे अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मनिषा पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेले होते. यावेळी डिझेल देण्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कामगार राहुल ढेरे (रा. लोहगाव) याच्याशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले. आरोपीने विश्वास डोळसे यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर विश्वास यांनी त्यांचे सहकारी वैभव लोंढे यांना मदतीसाठी फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. मात्र, वैभव हे तेथे आले असता आरोपी राहुल ढेरे आणि त्याच्या इतर अनोळखी साथीदारांनी वैभव यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

COMMENTS