बीड : संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. आश्रुबा (बबनराव) दगडू आंधळे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘युवा लोकमित्र समाजरत्

बीड : संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. आश्रुबा (बबनराव) दगडू आंधळे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘युवा लोकमित्र समाजरत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त युवा लोकमित्र परिवाराच्या पुरस्कार निवड समितीने त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल घेत ही निवड केली आहे.
प्रा. बबनराव आंधळे यांनी 14 जून 1993 रोजी अरुणा असफअली महिला मंडळ संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय, बीड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारला. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी हजारो गरीब, मागासवर्गीय आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृह आणि विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक न्यायासाठीही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी विविध आंदोलने, मोर्चे आणि जनजागृती अभियानांत त्यांनी नेतृत्व केले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर ‘भिक मांगो’ आंदोलनात सहभाग नोंदवत शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठवला. शेतकर्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी 1997-98 मध्ये जनता दलाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. तसेच केंद्रीय मंत्री स्व. रामविलास पासवान यांच्या कार्यकाळात दूरसंचार सल्लागार समितीवर त्यांची निवड झाली होती. सध्या ते लोकजनशक्ती पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रातही प्रा. आंधळे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. 2025 मध्ये त्यांची बीड जिल्हा सहकार बोर्डावर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. गेल्या 15 वर्षांपासून ते अरुणा असफअली शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय विविध सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केले आहे. ग्रामीण युवक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या 25 वर्षांत रक्तदान शिबिरे, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. विशेष म्हणजे, 2025-26 पासून बानेगाव येथे जन्मणार्या प्रत्येक मुलीच्या नावाने 10 हजार रुपयांची मुदत ठेव (एफडी) करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला त्यांनी कृतीतून बळ दिले आहे. बानेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही ते दोन दशकांहून अधिक काळ लोकसेवेत सक्रिय आहेत. गावातील धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध संस्थांची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार राहिला आहे. दरम्यान, या पुरस्काराचे वितरण 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता बीड येथील ‘ताज पॅलेस’मध्ये आयोजित विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रा. बबनराव आंधळे यांना राज्यस्तरीय ‘युवा लोकमित्र समाजरत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाल्याबद्दल बीड जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS