अधिक मासानिमित्त देशभरातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पुरुषोत्तम पुरी यात्रेदरम्यान बुधवारी (दि. 10) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सु

अधिक मासानिमित्त देशभरातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पुरुषोत्तम पुरी यात्रेदरम्यान बुधवारी (दि. 10) सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास एक भीषण बोट दुर्घटना घडली. भाविकांनी खचाखच भरलेली बोट गंगेच्या पाण्यात अचानक पलटी झाल्याने दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे यात्रेच्या नियोजनावर, सुरक्षाव्यवस्थेवर आणि बोट वाहतुकीच्या नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 40 ते 50 भाविकांना दाटीवाटीने बसवण्यात आले होते. त्यामुळे बोटीचा समतोल बिघडून ती अचानक पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि दुर्घटनेतून बचावलेल्या जखमी भाविकांनी सांगितले. बोट पाण्यात उलटल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अनेक भाविकांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत प्रमिला शेषराव राठोड (वय 54, रा. डीबी, ता. लोणार) आणि कांताबाई नामदेव आंधळे (वय 65, रा. कुंबेफळ, ता. लोणार) या दोन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर सिंधुताई अर्जुन मवाळ (वय 75, रा. महागाव, जि. वाशिम) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय अनेक भाविकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बचाव पथक, पोलीस, महसूल विभाग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू करून पाण्यात अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढले. काही काळासाठी परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, पुरुषोत्तम पुरी परिसरात यापूर्वीही अशाच प्रकारच्या दुर्घटना घडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी देखील येथे एक दुर्घटना घडली होती. तसेच मागील अधिक मास यात्रेदरम्यानही सुरक्षेच्या अभावामुळे दुर्घटना झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या माजलगाव येथील 13 वर्षीय आकाश लक्ष्मण मेहत्रे या पेढे विक्री करणार्या मुलाचाही मृत्यू झाला होता. या घटनांनंतरही संबंधित यंत्रणांनी कोणताही धडा घेतला नसल्याचा आरोप भाविकांकडून होत आहे. अधिक मास यात्रेनिमित्त लाखो भाविक पुरुषोत्तम पुरी येथे येणार असल्याची माहिती प्रशासन आणि मंदिर ट्रस्टला आधीपासूनच होती. मात्र एवढ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित बचाव पथके, लाइफ जॅकेटची उपलब्धता, बोटींवर प्रवासी मर्यादेचे काटेकोर पालन आणि वाहतुकीचे नियंत्रण यांसारख्या मूलभूत बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. दुर्घटनेनंतर संतप्त भाविकांनी मंदिर ट्रस्ट आणि संबंधित प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाविकांच्या जीविताशी खेळ करणार्या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, या दुर्घटनेमुळे संपूर्ण पुरुषोत्तम पुरी परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाकडून दुर्घटनेच्या कारणांचा तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे यात्रेच्या व्यवस्थापनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS