बीड : नागपूर येथे झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) जाचक अटी व शर्तींमुळे मोठ्या संख्य

बीड : नागपूर येथे झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या शासन निर्णयातील (जीआर) जाचक अटी व शर्तींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत शेतकरी पुत्र संघटना आणि शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची प्रत जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.
या वेळी शेतकरी हक्क मोर्चाचे नेते राजेंद्र आमटे यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर जोरदार टीका केली. नागपूर आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात काढण्यात आलेला शासन निर्णय शेतकर्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाने घातलेल्या विविध अटींमुळे पात्र असलेले अनेक शेतकरीही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमटे यांनी सांगितले की, अनेक बँकांनी शेतकर्यांची जुनी व नवी कर्जखाती एकत्रित केल्याने कर्जमाफीसाठी पात्र ठरणार्या शेतकर्यांनाही लाभ मिळणे कठीण होणार आहे. तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकर्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आल्याने त्यांच्यात नाराजी आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी तिचा लाभ केवळ कागदोपत्री राहणार असून शेतकर्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत पोहोचणार नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरसकट कर्जमाफीची मागणी करत गावोगावी जाऊन शेतकर्यांमध्ये जनजागृती केली जाणार असून, सरकारने निर्णयात सुधारणा न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात डॉ. गणेश ढवळे, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, अमर शेख, डॉ. संजय तांदळे, इनुस शेख, सर्फराज खान, हनुमान घोडके, रामधन जमाले, भीमराव कुटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
चौकट
शेतकरी आंदोलनाला खीळ घालण्याचे काम
बच्चू कडू हा शेतकर्यांचा गुन्हेगार आहे. आमदारकीच्या तुकड्यासाठी शेतकरी आंदोलन मातीत घालण्याचे काम बच्चू कडू यांनी केले आहे, असा आरोप शेतकरी पुत्र संघटनेचे नेते राजेंद्र आमटे यांनी यावेळी केला.

COMMENTS