Homeताज्या बातम्या

मान्सूनचे आज मुंबईत आगमन होण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशभरात मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून अवघ्या पाच दिवसांत त्याने 13 राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणात मान्सून दाखल झाल्यानंत

देशात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट
मान्सून केरळमध्ये 26 मे रोजी होणार दाखल
नागपूर, वर्ध्यात उष्णतेची लाट


नवी दिल्ली : देशभरात मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून अवघ्या पाच दिवसांत त्याने 13 राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणात मान्सून दाखल झाल्यानंतर आता तो मुंबईपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर पोहोचला असून आज बुधवारी मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सूनच्या प्रगतीमुळे अनेक भागांतील उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरी मान्सूनपूर्व वातावरणीय बदलांमुळे अनेक राज्यांत जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे वेगवान वार्‍यांमुळे अनेक झाडे कोसळली, तर कर्नाटकातील बेंगळुरू आणि बेळगाव परिसरात रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली. काही ठिकाणी वाहनेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. केरळ आणि कर्नाटकमध्ये सलग चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तिरुवनंतपुरमसह अनेक भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहारची राजधानी पाटणा तसेच हैदराबादमध्येही वादळी वार्‍यासह पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दिशेने आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पश्‍चिम किनारपट्टीसह ईशान्य भारतातील अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसह उत्तर-पश्‍चिम भारतातील काही भागांत उष्णतेची लाट कायम आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे तापमान 45.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. दिल्लीतही कमाल तापमान 43.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून उष्णतेची तीव्रता वाढल्याने अनेक राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 10 जून रोजी बिहार, झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. तसेच केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही पावसाचा जोर कायम राहू शकतो.

COMMENTS