मुंबई : नैऋत्य मान्सूनने शनिवारी महाराष्ट्रात प्रवेश केला असून आता अनेक भागांत पावसाची हजेरी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण आणि दक्षि
मुंबई : नैऋत्य मान्सूनने शनिवारी महाराष्ट्रात प्रवेश केला असून आता अनेक भागांत पावसाची हजेरी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच काही जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. गोवा प्रदेश व्यापल्यानंतर मोसमी वारे तळकोकणात दाखल झाले असून पुढील काही दिवसांत ते राज्याच्या उर्वरित भागातही वेगाने पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा मोसमी वाऱ्यांचे केरळमध्ये आगमन सरासरीपेक्षा तीन दिवस उशिराने झाले. ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची उत्तरेकडे वाटचाल वेगाने सुरू राहिली. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू तसेच अरबी समुद्रातील काही भाग आणि गोवा व्यापत मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत पोहोचला. आता मान्सूनच्या आगमनामुळे खरीप हंगामाच्या तयारीलाही वेग येण्याची अपेक्षा आहे. मुंबईसह उत्तर कोकणातही लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने विजांच्या कडकडाटाच्या काळात सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, तर किनारपट्टी भागातील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी सतर्कता बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’चा (Yellow Alert) इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS