Homeताज्या बातम्या

धुळीच्या वादळासह गारपिटीचा कहर; नांदेड जिल्ह्यात शेती, घरे व गोठ्यांचे मोठे नुकसान

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, धुळीचे वादळ आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः महाराष्ट्

मोदी सरकारच्या प्रस्तावित ऊस नियंत्रण  आदेशाला शेतकरी संघटनेचा विरोध
वादळाने केळी भुईसपाट; निवघ्यात खा.चव्हाणांची पाहणीहेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी
अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला तडाखा; नांदला-दिग्रस परिसरात केळी बागांचे मोठे नुकसान


नांदेड : नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, धुळीचे वादळ आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागात गारपिटीचा जोर अधिक असल्याने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी घरे आणि जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.
दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जिल्ह्यातील अनेक भागांत प्रचंड वेगाने वारे वाहू लागले. वार्‍याचा वेग इतका तीव्र होता की अनेक ठिकाणी धुळीचे वादळ निर्माण झाले. काही काळ रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. त्यानंतर मुसळधार पावसासह गारपिटीने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची मोठी आर्थिक हानी झाली. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील गावांमध्ये गारांच्या तडाख्यामुळे कापूस, मका, भाजीपाला, फळबागा तसेच अन्य हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक शेतांमध्ये पिके जमीनदोस्त झाली असून काही ठिकाणी फळबागांवरील फळे गळून पडली आहेत. शेतकर्‍यांनी मोठ्या अपेक्षेने जोपासलेली पिके काही मिनिटांच्या नैसर्गिक संकटात उद्ध्वस्त झाल्याने हतबलता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात अनेक घरांवरील टिनपत्रे व छप्परे उडून गेली आहेत. काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाल्याने पशुपालकांनाही मोठा फटका बसला आहे. वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या असून काही भागांत वीजपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान, नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शेतकरी, पशुपालक आणि घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कृषी व महसूल विभागाने त्वरित सर्वेक्षण करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाच्या या तडाख्याने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

COMMENTS