संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई या 'ग्रीनफिल्ड' महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांम

संगमनेर : तालुक्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई या ‘ग्रीनफिल्ड’ महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी शिष्टमंडळाने राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत थोरात यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन लावून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची मागणी केली.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे तळेगाव भागातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी माजी उपसभापती अविनाश सोनवणे, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, डॉ. संदीप गोर्डे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
१०८३ हेक्टर जमीन संपादित; एकरी अवघा ७ ते १० लाख भाव सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून एकूण १०८३.८८ हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, तळेगाव, अजमपूर, आरामपूर, वरझडी बुद्रुक, वरझडी खुर्द, हसनाबाद, जुने गाव, लोहारे, कासारे, सादतपूर, चिंचपूर या गावांमधील मोठ्या प्रमाणात शेतजमिनींचा समावेश आहे. २०२१-२२ मधील भूसंपादनाच्या आराखड्यानुसार या जमिनींना एकरी अवघा ७ ते १० लाख रुपये भाव देण्यात आला आहे, जो बाजारभावापेक्षा अत्यंत कमी आहे.
बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला भाव मिळावा व संपादित जमिनीचे फेरमूल्यांकन व्हावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बाळासाहेब थोरात यांनी या मागणीला पाठिंबा देत, यूपीए सरकारच्या काळात काँग्रेस आघाडीने नेहमीच शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला दिल्याचा उल्लेख केला. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवरून संवाद साधत दुष्काळी भागातील या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची मागणी केली, ज्यावर नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

COMMENTS