कोपरगाव : धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि दक्षिण काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुण

कोपरगाव : धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि दक्षिण काशी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा येथील गोदावरी नदीकाठावरील ऐतिहासिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी तातडीने निधी देण्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पुणतांबा हे तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असून गोदावरी नदीकाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला अहिल्या घाट हा या परिसराच्या वैभवाचा आणि अस्मितेचा ऐतिहासिक ठेवा आहे. या घाटावर २६ भव्य दगडी पायऱ्या, आकर्षक गोलाकार बुरूज, प्राचीन महादेव मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर आणि संत चांगदेव महाराज समाधी परिसर यांसारखी महत्त्वाची धार्मिक व पवित्र स्थळे आहेत. या ऐतिहासिक वारशामुळे येथे राज्यभरातून हजारो भाविक आणि पर्यटक भेट देत असतात.
परंतु, काळाच्या ओघात आणि योग्य देखभालीअभावी सध्या या ऐतिहासिक घाटाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटाचे जुने दगडी बांधकाम झिजत चालले असून अनेक ठिकाणी भिंतींना व पायऱ्यांना मोठे तडे गेले आहेत. घाटावर येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत, कठडे, स्वच्छता, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आणि एकूणच सुशोभीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीशी निगडित असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे मूळ वैभव टिकवण्यासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी आ. काळे यांनी केली आहे.

COMMENTS