नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, लोहा-कंधार मतदारसंघाचे राष्ट्रवादी क
नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, लोहा-कंधार मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुनेत्राताई पवार यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
या भेटीदरम्यान आमदार चिखलीकर यांनी आपले पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची मागणी केल्याचे समजते. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युवा नेतृत्वाला संधी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडल्याची चर्चा आहे. या बैठकीस शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर तसेच सुलक्षणा सलगर यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे, अर्जुन खोतकर यांनी देखील जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आपले पुत्र अभिमन्यू खोतकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राजकीय वारसांना संधी देण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले अमरनाथ राजूरकर यांच्या उमेदवारीसमोर अडचणी निर्माण करण्यासाठी आमदार चिखलीकर यांनी ही राजकीय रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा विविध पक्षांतील अंतर्गत हालचाली आणि राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र दिसत आहे.

COMMENTS