देवळाली प्रवरा : मुळा धरणाच्या पाण्यावर बारागाव नांदूर ते जांभळी दरम्यान सुरू असलेली प्रवासी यांत्रिक बोट कालबाह्य झाल्याने वारंवार नादुरुस्त होत

देवळाली प्रवरा : मुळा धरणाच्या पाण्यावर बारागाव नांदूर ते जांभळी दरम्यान सुरू असलेली प्रवासी यांत्रिक बोट कालबाह्य झाल्याने वारंवार नादुरुस्त होत आहे. यामुळे धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांचा राहुरी तालुक्याशी संपर्क वारंवार तुटत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक नवीन यांत्रिक बोट उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे.
बोटी संदर्भात बोलताना तनपुरे म्हणाले की, मुळा धरण उभारल्यानंतर जलफुगवट्यामुळे या तीन गावांना पाण्याचा वेढा पडला. त्यामुळे ग्रामस्थांना राहुरी येथे ये-जा करण्यासाठी ही यांत्रिक बोट मोठा आधार ठरत आहे. मात्र सध्याची बोट कालबाह्य झाली असून तिचा गिअरबॉक्स वारंवार तुटत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून बोट बंद असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरातील नागरिकांना आजही जीव धोक्यात घालून मासेमारीच्या छोट्या होड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.
‘ते’ ९० लाख कोठे गेले? सन २०२१ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नवीन बोटीसाठी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. जिल्हा परिषदेमार्फत निविदा प्रक्रिया राबवून गुजरातमधील एका ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने पैसे घेऊन सुमारे ६० टक्के काम केल्यानंतर बोट बांधणीचे काम बंद केल्याचा आरोप तनपुरे यांनी केला. त्यामुळे शासनाचे पैसे गेले आणि बोटही मिळाली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
२००२ मध्ये झाला होता तिघांचा मृत्यू मुळा धरणात २००२ साली अशीच एक छोटी होडी बुडाल्याने तिघांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेच्या कटू आठवणी आजही ताज्या असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांसह प्रवास करता येईल अशी अत्याधुनिक यांत्रिक बोट उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दुर्गम भागातील या तीन गावांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असेही तनपुरे यांनी नमूद केले.

COMMENTS