वाशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वाशिंग्टन येथे व्हाईट हाऊस परिसरात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली. अतिसंवे

वाशिंग्टन : अमेरिकेची राजधानी वाशिंग्टन येथे व्हाईट हाऊस परिसरात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली. अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या या परिसरात अचानक गोळीबार सुरू झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी काही क्षणांत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रत्युत्तरात्मक कारवाईत संशयित हल्लेखोर ठार झाला असून एका पादचाऱ्याला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. मात्र, त्यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुरक्षित असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या जवळील सतराव्या गल्ली आणि पेनसिल्व्हेनिया मार्ग परिसरात रात्री अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले. हा भाग व्हाईट हाऊसच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात असताना एका संशयित व्यक्तीने सुरक्षा चौकीजवळ येत आपल्या पिशवीतून शस्त्र बाहेर काढले आणि अचानक गोळीबार सुरू केला. घटनेच्या वेळी तेथे अमेरिकेच्या गुप्त सुरक्षा दलाचे (Secret Service) जवान तैनात होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. काही मिनिटे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या चकमकीत संशयित गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत एका सामान्य नागरिकालाही गोळी लागली. तो त्या परिसरातून जात असताना गोळीबाराच्या तावडीत सापडल्याचे सांगण्यात आले. संबंधित व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेत गुप्त सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही. त्यामुळे सुरक्षा दलाच्या तातडीच्या प्रतिसादाचे कौतुक केले जात आहे.
घटनेनंतर काही क्षणांतच संपूर्ण परिसरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली. व्हाईट हाऊसच्या उत्तर भागातील परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. काही काळासाठी परिसरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. तेथे उपस्थित पत्रकार, अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी सांगितले की, अचानक जोरदार गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सर्वांना त्वरित सुरक्षित कक्षात जाण्याच्या सूचना दिल्या. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य मोठा धोका टाळण्यासाठी व्हाईट हाऊसच्या छतावर विशेष प्रशिक्षित नेमबाज तैनात करण्यात आले होते. संपूर्ण परिसरावर अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने नजर ठेवली जात होती. संशयित आणखी कोणत्या गटाशी संबंधित होता का, याचाही शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. अमेरिकेच्या गुप्त सुरक्षा दलाने सामाजिक माध्यमांवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सायंकाळी सहानांतर काही वेळातच एका व्यक्तीने शस्त्र बाहेर काढून गोळीबार सुरू केला. सुरक्षा जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

COMMENTS