मुंबई : सुमारे तीन कोटी रुपयांच्या ७०२ किलो गांजासह दोघांना मुंबई युनिटच्या एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांनी गोंदिया येथून अटक केली. प्रकाश एम. डी. आणि

मुंबई : सुमारे तीन कोटी रुपयांच्या ७०२ किलो गांजासह दोघांना मुंबई युनिटच्या एनसीबी (NCB) अधिकाऱ्यांनी गोंदिया येथून अटक केली. प्रकाश एम. डी. आणि पदमलाल एन. एम. अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे सदस्य आहेत. जप्त केलेला गांजा ओडिशातून महाराष्ट्रातील विविध शहरांत वितरित होणार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून, ते सध्या एनसीबी कोठडीत आहेत.
ओडिशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पथकाने संबंधित गांजा तस्करांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असताना पथकाने गोंदिया येथे कारवाई करून एका ट्रकला ताब्यात घेतले. या ट्रकची तपासणी केली असता त्यात डिटर्जंट, टूथपेस्ट आणि हेअर डायसारखा किराणा माल सापडला. या सामानाच्या आड गांजाची तस्करी केली जात होती. याच ट्रकमधून अधिकाऱ्यांनी १०० पाकिटे जप्त केली. या पाकिटांतून ७०२ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. तपासात हा गांजा ओडिशातून महाराष्ट्रात आणून नागपूर, पुणे, मुंबई, गोंदिया येथे वितरित होणार असल्याचे उघड झाले.
किरकोळ विक्रेत्यांच्या मदतीने या गांजाची थेट ग्राहकांना विक्री केली जात होती. याबाबतची माहिती प्राप्त होताच गेल्या दोन महिन्यांपासून एनसीबीचे अधिकारी संबंधित माहितीची शहानिशा करत होते. अखेर या अधिकाऱ्यांना या आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

COMMENTS