मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर आपण पुढील दोन ते तीन वर्ष कायम ठेवला तर सिंगापूर आणि यूएई या देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकू शकतो, अश

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर आपण पुढील दोन ते तीन वर्ष कायम ठेवला तर सिंगापूर आणि यूएई या देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकू शकतो, अशा प्रकारची स्थिती आहे. पंतप्रधान मोदी यांचे मिशन हे आमचे मिशन आहे. तेच मिशन आम्ही महाराष्ट्रात राबवत आहोत. जागतिक परिस्थिती पाहता, आता नाही, तर कधी नाही, या स्तरावर आपण आहोत. त्यामुळे त्यानुसारच विकासाच्या वाटेवर आम्ही पुढे जात आहोत. २०४७ मध्ये विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यावरील एल निनो प्रभावाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, एल निनो प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जय्यत तयारी सुरू केलेली आहे. एल निनोचा प्रभाव राज्यात वेगवेगळा असणार आहे आणि त्यामुळे राज्यातील पावसाचा अंदाजही वेगळा वर्तवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या उपाययोजना राबवल्या जाऊ शकतात, त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
इंधन पुरवठ्याबाबत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल विशेषतः डिझेलबाबत योग्य ते नियोजन करावे. कारण शेतीच्या कामांसाठी आता डिझेल वापर वाढेल. त्यामुळे इंधनाची साठेबाजी होऊ देऊ नका. आवश्यकतेनुसार डिझेल मिळायला हवे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु, ही तणावाची स्थिती सर्व दूर नाही. एखाद्या ठिकाणी काही घटना होत आहे आणि तीच हायलाइट होत आहे. परंतु, तसेही घडू नये, याची काळजी घेतली जात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आताच्या घडीला कृत्रिम बुद्धिमत्तेची लाट जगभरात आली असून, आपल्या जीवनातील बहुतांश गोष्टींवर एआयचा प्रभाव वाढलेला आहे. एआयच्या लाटेवर आरूढ होऊन आपल्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची जी लढाई आहे, तिला गती देऊ शकते. त्याला व्यापक स्वरुप देऊ शकतो. तोच प्रयत्न इंडिया एआय या माध्यमातून पंतप्रधान मोदी करत आहेत. तोच प्रयत्न आपण महाराष्ट्रात करत आहोत. एआयचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एआयची मदत घेतली जाऊ शकते, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

COMMENTS