देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या ‘नीट-यूजी’ (छएएढ-णॠ) पेपरफुटी प्रकरणाने आता राष्ट्रीय पातळीवरील संघटित रॅकेटचे रूप ध

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या ‘नीट-यूजी’ (छएएढ-णॠ) पेपरफुटी प्रकरणाने आता राष्ट्रीय पातळीवरील संघटित रॅकेटचे रूप धारण केले असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट नागपूर आणि दिल्लीतील ‘एनटीए’ कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (उइख) तपासातून समोर आले आहे. या संपूर्ण घोटाळ्याच्या केंद्रस्थानी तब्बल 20 हजार कोटी रुपयांचे खाजगी कोचिंग साम्राज्य आणि त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयांशी असलेले छुपे साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे. तपास यंत्रणांच्या मते, नियोजनबद्ध पद्धतीने हा लीक झालेला पेपर देशभरातील सुमारे 1,000 लाभार्थी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
भारतातील खाजगी कोचिंग उद्योगाची उलाढाल सध्या 20 हजार कोटी रुपयांच्या घरात गेली असून, जेईई आणि नीटसारख्या स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या दबावामुळे हे साम्राज्य अधिक मजबूत झाले आहे. सीबीआयच्या तपासानुसार, अनेक कोचिंग क्लास चालकांनी कनिष्ठ महाविद्यालयांशी ‘टाय-अप’ करून विद्यार्थ्यांना नाममात्र प्रवेश दिला जात होता. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना निवासी कॅम्पसमध्ये ठेवून पूर्णवेळ कोचिंग दिले जात होते. या आर्थिक जाळ्यातूनच प्रश्नपत्रिका खरेदीसाठी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला लातूरमधील नामांकित रेणुकाई संस्था (क्लास) चालक शिवराज मोटेगावकर हा संपूर्ण सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे कोर्टातील रिमांड नोटमधून स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी होणार्या नीट परीक्षेच्या तब्बल दोन दिवस आधी म्हणजे 1 मे रोजीच प्रश्नपत्रिका फुटली होती. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापक व एन टी ए चा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याने रसायनशास्त्र विषयाचे 132 प्रश्न मोटेगावकरला पुरवल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हा प्रकार केवळ स्वतःच्या मुलासाठी करण्यात आल्याचा संशय होता; मात्र सीबीआयच्या मते मोटेगावकर हा मोठ्या आंतरराज्य सिंडिकेटचा भाग असून त्याच्याकडे परीक्षेच्या दहा दिवस आधीपासून संशयास्पद माहिती उपलब्ध होती. तपास यंत्रणांनी उघड केलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका एका गुप्त साखळीद्वारे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतील पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. टेलिग्राम आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे प्रश्नपत्रिकेची पीडीएफ स्वरूपात देवाणघेवाण करण्यात आली होती. नांदेडसह विविध भागांतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पंधरा दिवस आधी पुण्यात पाठवण्यात आले होते. तिथे आरोपी बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांडरे आणि इतरांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना लीक झालेले प्रश्न पाठ करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. नागपूरमधील ‘आलोक’ नावाच्या व्यक्तीमार्फत अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. नांदेडमधील विद्युतनगर परिसरातील एका महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल पाच लाख रुपयांत प्रश्नपत्रिका खरेदी केली होती. त्यातील 25 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आल्याचे पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. प्रत्येक पालकाकडून पाच ते पंधरा लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घोटाळ्यातील एक उपरोधिक बाबही तपासात समोर आली आहे. नांदेडमधील एका विद्यार्थिनीला प्रश्नपत्रिका मिळूनही अपेक्षित यश मिळाले नाही. माध्यमांमध्ये तिला 560 गुण मिळाल्याची चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात तिचे गुण अवघे 460 निघाले. संबंधित विद्यार्थिनीची गुणवत्ता बेताची असल्याने लाखो रुपये खर्च करूनही अपेक्षित निकाल लागला नाही आणि त्यामुळे संबंधित कुटुंबात मोठा वाद निर्माण झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. दरम्यान, लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनीही धक्कादायक निरीक्षण नोंदवले आहे. गेल्या काही वर्षांत राजस्थानसह इतर राज्यांतील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, नीटमध्ये 600 पेक्षा अधिक गुण मिळवून प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील साधे पेपरही उत्तीर्ण करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा प्रकार केवळ एका वर्षापुरता मर्यादित नसून, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संगनमताचा भाग असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवराज मोटेगावकरला नऊ दिवसांची सीबीआय कोठडी मिळाल्यानंतर तपास यंत्रणांनी लातूरमध्ये तळ ठोकला आहे. सीबीआयची पथके सतत क्लासेस परिसरातील रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत. तपासाचा फास आवळताच नांदेडसह अनेक शहरांतील काही नामांकित कोचिंग क्लास चालकांनी ‘सत्र संपले’ असे फलक लावून कार्यालये बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कामकाजाचे मूल्यांकन करण्यासाठी संसदीय समितीने 21 मे रोजी बैठक बोलावली असून, या प्रकरणावरून केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयावरही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. सध्या 1,000 हून अधिक पालक सीबीआयच्या रडारवर असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS