उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात मानवतेला काळिमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील महिलांना बेदम मार
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात मानवतेला काळिमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबातील महिलांना बेदम मारहाण करून त्यांचे केस कापण्यात आले, तसेच कपडे फाडून त्यांची अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील वाघरी नगर परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक जात पंचायतीने काही महिन्यांपूर्वी पीडित कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला होता आणि त्यांना मंदिरात जाण्यास बंदी घातली होती. घटनेच्या दिवशी मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पीडित कुटुंबातील एका तरुणाने “आमची चूक काय?” असा जाब विचारत मंदिरात प्रवेश केला. यावरून वाद वाढला आणि आरोपींनी काठ्या व लोखंडी सळ्यांसह पीडितांच्या घरावर हल्ला केला.
भीतीपोटी कांता राजपूत, गीता राजपूत आणि अंजली राजपूत या महिला कुटुंबासह विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, हडकमाता चौकाजवळ आरोपींनी त्यांना अडवून पुन्हा हल्ला केला. महिलांना रस्त्यावर ओढत नेऊन त्यांचे कपडे फाडण्यात आले आणि कात्रीने केस कापले. त्यानंतर त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत त्यांची जाहीर धिंड काढण्यात आली. यावेळी मोठी गर्दी जमली होती, मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
सोशल मीडियावरील व्हिडिओनंतर पोलिसांना जाग! पीडित कुटुंब विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले, मात्र सुरुवातीला पोलिसांनी सौम्य गुन्हे दाखल करून प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप कुटुंबाने केला आहे. मात्र, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन जनक्षोभ वाढल्यानंतर पोलिसांनी कारवाईला वेग दिला. या प्रकरणी जुली वाघरी, विनू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू उर्फ बाळू वाघरी, महेश वाघरी आणि इतरांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.

COMMENTS