भोपाळ : देशातील न्यायव्यवस्था ही सर्वसामान्यांच्या अपेक्षा आणि अडचणी लक्षात घेऊन चोवीस तास कार्यरत राहणाऱ्या रुग्णालयांसारखी सक्षम व्हावी, अशी अप

भोपाळ : देशातील न्यायव्यवस्था ही सर्वसामान्यांच्या अपेक्षा आणि अडचणी लक्षात घेऊन चोवीस तास कार्यरत राहणाऱ्या रुग्णालयांसारखी सक्षम व्हावी, अशी अपेक्षा भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी व्यक्त केली. डिजिटल युगात न्यायप्रणाली अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. न्यायप्रक्रियेत एकात्मिक डिजिटल प्रणालीचा वापर आणि त्यातून न्यायदान अधिक प्रभावी कसे होऊ शकते, यावर या परिसंवादात चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश उपस्थित होते.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, न्यायप्रणालीतील डिजिटल साधने ही ग्रामीण भागातील आणि तंत्रज्ञानाची कमी माहिती असलेल्या नागरिकांनाही सहज वापरता आली पाहिजेत. त्यासाठी स्थानिक स्तरावर कायदेविषयक स्वयंसेवक तयार करण्याची आवश्यकता असून ते नागरिकांना डिजिटल न्यायप्रक्रियेशी जोडण्याचे महत्त्वाचे काम करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष समिती कार्यरत आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे त्रुटींना मोठ्या प्रमाणात आळा बसेल आणि न्यायप्रक्रिया अधिक संवेदनशील व गतिमान बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

COMMENTS