दुबई : होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एका भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याची घटना

दुबई : होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एका भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात जहाजावरील एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, उर्वरित १७ खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
अल्ताफ तलाब केर असे मृत खलाशाचे नाव असून, ते गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील जाम सलाया गावचे रहिवासी होते. ‘अल फैज नूर सोलेमानी’ असे या मालवाहू जहाजाचे नाव असून ते दुबईहून येमेनकडे माल घेऊन जात असताना हा प्रकार घडला. हल्ल्यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि ते समुद्रात बुडू लागले. दुर्दैवाने, इंजिन विभागात कार्यरत असलेले अल्ताफ यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ‘प्रेम सागर’ नावाचे दुसरे जहाज मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी १७ खलाशांची सुखरूप सुटका केली. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून जहाजाच्या मालकाशी संपर्क साधला आहे. मृत खलाशाच्या कुटुंबाला आणि प्रभावित खलाशांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दूतावासाने दिले आहे. भारतीय नौकायन संघटनेचे सरचिटणीस आदम भाया यांनी या प्रकरणी दूतावासाला पत्र पाठवून सखोल तपासाची मागणी केली आहे.

COMMENTS