कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षाच्या नव्या सरकारच्या नेतृत्वाची सूत्रे सुवेंदू अधिकारी यांच्या हाती जाणार आहेत. सुवेंदू अधिकारी हे पश्चि
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षाच्या नव्या सरकारच्या नेतृत्वाची सूत्रे सुवेंदू अधिकारी यांच्या हाती जाणार आहेत. सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील. कोलकाता येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
यासोबतच गृह खाते आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीही त्यांच्याकडेच राहणार असल्याचे वृत्त आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी अभिनेत्री व नेत्या रूपा गांगुली या उपमुख्यमंत्री असतील, तर दुसरे उपमुख्यमंत्री उत्तर बंगाल विभागातून असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. तसेच नंदीग्राम मतदारसंघातून त्यांनी सलग दुसर्यांदा विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले. याच मतदारसंघात त्यांनी यापूर्वी 2021 मध्येही ममता बॅनर्जी यांना धक्का दिला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोलकाता दौर्यानेही राजकीय हालचालींना वेग आला. सुवेंदू अधिकारी यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेते एकाच वाहनातून दक्षिणेश्वर काली मंदिरात गेले. मंदिरात अमित शहा यांनी पूजा व आरती केली. राज्यातील निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी राजकीय वातावरण अधिक तापले आहे. 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात 293 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 207 जागांवर विजय मिळवला, तर तृणमूल काँग्रेसला 80 जागांवर समाधान मानावे लागले. एका मतदारसंघातील मतदान पुढे ढकलण्यात आले असून त्याचा निकाल नंतर जाहीर होणार आहे. निकालानंतर 5 मे रोजी ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. पराभवामागे कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर 6 मे रोजी सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची मध्यमग्राम येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वाहन अडवून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. त्यानंतर 7 मे रोजी राज्यपालांनी पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित करण्याची अधिसूचना जारी केली. त्यामुळे विद्यमान मंत्रिमंडळाचे अधिकार संपुष्टात आले असून नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज होणार शपथविधी
मुख्यमंत्री शनिवारी सकाळी 10 वाजता कोलकाता येथील ’ब्रिगेड परेड ग्राउंड’वर पदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभास उपस्थित राहणार आहेत.

COMMENTS