राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या कॅरिडॉर प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाल

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या कॅरिडॉर प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. शिखर समितीच्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी योजनेला अंतिम मान्यता देण्यात आली असून, भू-संपादन प्रक्रिया एक ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास आराखड्याला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, हा प्रकल्प केवळ विकासाचा उत्सव ठरणार की संतुलनाची कठीण कसोटी, हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा ठरतो.
पंढरपूर हे केवळ एक शहर नाही, तर कोट्यवधी वारकर्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या काळात येथे लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळते. गेल्या काही वर्षांत भाविकांची वाढती संख्या, अपुरी पायाभूत सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनातील अडचणी यामुळे या शहरावर ताण वाढत गेला आहे. या पार्श्वभूमीवर कॅरिडॉर प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. मंदिर परिसराचा विस्तार, रस्त्यांचे रुंदीकरण, प्रतीक्षा कक्ष, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक सुधारणा आणि आपत्कालीन यंत्रणा यांचा समावेश या प्रकल्पात आहे. या सर्व उपाययोजनांमुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध दर्शनाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या प्रकल्पाचा सर्वात मोठा सकारात्मक पैलू म्हणजे नियोजनबद्ध विकास. धार्मिक पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक बनत चालला आहे. पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रात आधुनिक सुविधा निर्माण झाल्यास स्थानिक अर्थकारणाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल आणि शहराची प्रतिमा उंचावेल. अनेक व्यापार्यांसाठी हा प्रकल्प संधी घेऊन येऊ शकतो. वाढती भाविकसंख्या आणि सुधारलेली व्यवस्था यामुळे व्यापाराला गती मिळेल, अशी शासनाची भूमिका आहे. परंतु, या चित्राचा दुसरा पैलूही दुर्लक्षित करता येणार नाही. कॅरिडॉर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर भू-संपादन करावे लागणार आहे. यामध्ये अनेक स्थानिक रहिवासी आणि लहान व्यापार्यांचे स्थलांतर अपरिहार्य ठरू शकते. सुरुवातीला या निर्णयाला विरोध होण्यामागे हीच चिंता होती. घर, दुकान किंवा उपजीविकेचा आधार गमावण्याची भीती ही केवळ आर्थिक नसून सामाजिक आणि भावनिकही असते. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे हक्क बाधित होणार नाहीत, याची खात्री शासनाने देणे अत्यावश्यक आहे. याठिकाणी शासनाच्या धोरणात्मक संवेदनशीलतेची खरी परीक्षा आहे. पुनर्वसन आणि भरपाईची प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य आणि वेगवान असली पाहिजे. केवळ आर्थिक मोबदला देणे पुरेसे ठरणार नाही; नव्या ठिकाणी समान किंवा अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणेही गरजेचे आहे. अन्यथा, विकासाची ही गाडी काहींच्या आयुष्यावर गदा आणणारी ठरू शकते.
याशिवाय, पंढरपूरच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. अति-आधुनिकतेच्या ओघात या शहराचा पारंपरिक आत्मा हरवू नये, याची खबरदारी घ्यावी लागेल. वारकरी संप्रदायाची साधी, सोज्वळ आणि भक्तिमय परंपरा ही पंढरपूरची खरी ओळख आहे. कॅरिडॉर प्रकल्पामुळे ही ओळख जपली जाईल की ती केवळ एक ‘पर्यटन स्थळ’ बनून राहील, याचा विचार करणे आवश्यक आहे. शहर नियोजनाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प आव्हानात्मक आहे. वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरणीय परिणाम, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या बाबींचे दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत असताना पर्यावरणीय समतोल बिघडणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा, विकासाचा हा प्रयत्न उलट पर्यावरणीय संकटाला आमंत्रण देऊ शकतो. शासनाने या प्रकल्पासाठी ठरवलेली कालमर्यादा महत्त्वाची आहे. भू-संपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, आराखड्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करणे आणि कामांमध्ये पारदर्शकता ठेवणे-या सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच प्रकल्प यशस्वी ठरेल. अन्यथा, अनेक मोठ्या प्रकल्पांप्रमाणे हा प्रकल्पही विलंब आणि खर्चवाढीच्या गर्तेत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. संवादाच्या माध्यमातून त्यांच्या शंका दूर करणे, त्यांचे मत ऐकणे आणि त्यांना विश्वासात घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. विकास हा लोकांच्या सहभागातूनच सशक्त होतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एकंदरीत, पंढरपूर कॅरिडॉर प्रकल्प हा शहराच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. योग्य नियोजन, संवेदनशील अंमलबजावणी आणि स्थानिकांच्या हिताचा विचार यांचा समन्वय साधला गेला तर हा प्रकल्प आदर्श ठरेल. अन्यथा, तो वादग्रस्त ठरण्याचीही शक्यता आहे. विकासाची वाटचाल करताना श्रद्धा, संस्कृती आणि मानवी मूल्ये यांचा समतोल राखणे हीच खरी कसोटी असते. पंढरपूरसारख्या पवित्र स्थळासाठी तर ही जबाबदारी अधिकच मोठी आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ भौतिक बदल घडवणारा न राहता, तो सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध करणारा ठरावा, हीच अपेक्षा.

COMMENTS