मुंबई : पायधुनी परिसरातील दोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्

मुंबई : पायधुनी परिसरातील दोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत संबंधित टरबूजामध्ये कोणतीही भेसळ नसल्याचे स्पष्ट झाले असून, टरबूज खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे या घटनेमागील खरे कारण काय, याबाबतचे गूढ आणखीच गडद झाले आहे.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, तसेच मुली आएशा व जैनब यांचा बिर्याणी खाल्ल्यानंतर टरबूज खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तपासणीतून हा अंदाज चुकीचा ठरत असल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळावरून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी एकूण अकरा नमुने जप्त केले होते. यामध्ये बिर्याणी, टरबूज, पिण्याचे पाणी, कच्चे व शिजवलेले अन्नपदार्थ, मसाले आदींचा समावेश होता. प्रयोगशाळेत सखोल तपासणीनंतर टरबूजामध्ये कोणताही कृत्रिम रंग किंवा रासायनिक घटक आढळला नाही. तसेच इतर अन्नपदार्थांमध्येही भेसळीचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. दरम्यान, प्राथमिक न्यायवैद्यक तपासणीत मृतांच्या अंतर्गत अवयवांचा रंग हिरवट झाल्याचे आढळले आहे. मेंदू, हृदय आणि आतडी या अवयवांमध्ये झालेला हा बदल सामान्य अन्नातून होणार्या विषबाधेत सहसा दिसत नाही. त्यामुळे शरीरात एखाद्या तीव्र विषारी घटकाचा प्रवेश झाला असावा, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणातील सर्व शक्यता तपासल्या जात असून, अंतिम न्यायवैद्यक अहवाल आणि सूक्ष्मजीव तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अनुत्तरितच राहिले आहे.
मॉर्फिन आढळल्याने नवे प्रश्न
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अब्दुल्ला दोकाडिया यांच्या शरीरात ‘मॉर्फिन’ नावाचे तीव्र वेदनाशामक औषध आढळले आहे. हे औषध साधारणतः वैद्यकीय देखरेखीखालीच वापरले जाते. त्यामुळे ते त्यांच्या शरीरात कसे गेले, याचा शोध घेणे तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

COMMENTS