नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील सफाई कर्मचार्यांच्या विविध मागण्यांवर प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याच

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील सफाई कर्मचार्यांच्या विविध मागण्यांवर प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. बुधवारी दिवसभरात प्रशासनातील कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याने युनियनशी संपर्क साधला नाही किंवा चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे गुरुवार, 30 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजल्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गणेश शिंगे यांनी केली.
बुधवारी रेल्वे स्थानकासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शेकडो कर्मचार्यांनी महानगरपालिकेकडे मोर्चा काढला. या मोर्चात स्वच्छता व सफाई विभागातील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणाबाजी करत कर्मचार्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. यापूर्वी मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शहरातील कचरा संकलनाचे काम करणार्या अमृत एंटरप्राईजेस या खासगी संस्थेने 80 ते 85 कामगारांना अचानक कामावरून कमी केल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात संतप्त कर्मचार्यांनी तीव्र आंदोलन छेडले. सकाळी उपायुक्तांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर काही कर्मचार्यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्त बाहेर पडताच आंदोलकांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच वजीराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकार्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या आंदोलनात शैलेश कांबळे, प्रसन्नजीत अवताडे, राजेश माने, संदीप पाईकराव, महेश शिंगे, सचिन शिंगे, हरीश आवताडे, अंकित पाईकराव, कपिल सावंत, सुमेध सूर्यवंशी, अशोक गायकवाड, सुमित कंधारे, प्रल्हाद उपदे, भीमराव पावरे, आनंद ज्ञानभुरे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू झाल्यास शहरातील दैनंदिन स्वच्छता व्यवस्था विस्कळीत होऊन कचरा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS