Homeताज्या बातम्याबीड

संतांची सेवा करण्यासाठी देव अवतार धारण करतात-रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे सुरू असलेल्या भव्य श्रीराम कथेमध्ये भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत असून, चौथ्या दिवसाच्या कथेत श्रोते अक्षरश

राज्यात 10 नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार सुरू
भाजप नेते पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी
उत्तर प्रदेशात काँग्रेस, बसपाला दोन अंकी संख्या गाठण्यात अपयश



बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे सुरू असलेल्या भव्य श्रीराम कथेमध्ये भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत असून, चौथ्या दिवसाच्या कथेत श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. यावेळी श्री ह.भ.प. रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांनी संतसेवेचे महत्त्व अधोरेखित करत प्रभावी निरूपण केले.
महाराज म्हणाले की, संतांची सेवा करण्यासाठी देव स्वतः अवतार धारण करतात. भक्तांच्या सेवेसाठीच परमेश्वर चतुर्भुज रूप धारण करतो. दोन हातांनी सर्व कार्य शक्य नसल्यानेच देव चार हात घेऊन येतो, असे सांगत त्यांनी संत जनाबाई व विदुर यांच्या उदाहरणांद्वारे संतसेवेचे महत्त्व स्पष्ट केले. ही कथा संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, ह.भ.प. प्रकाश महाराज साठे, नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. श्रीराम जन्मकथा सांगताना महाराजांनी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या नामांचे आध्यात्मिक महत्त्व उलगडले. राम म्हणजे सत्य आणि लक्ष्मण म्हणजे समर्पण, असे सांगत त्यांनी रामनामाच्या जपातून जीवनाला दिशा मिळते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमादरम्यान सांवळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो या गीत रामायणातील ओवीवर आधारित कथन सादर करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित श्रोते भावविभोर झाले आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. पुढे बोलताना महाराज म्हणाले, आई, वडील, गुरु आणि अतिथी हेच खरे देव आहेत. मोठी माणसं लहान होतात, तेव्हाच समाज मोठा होतो. संत एकनाथ महाराज आणि संत बंकटस्वामी यांच्या उदाहरणातून त्यांनी नम्रतेचे महत्त्व सांगितले. संत तळागाळात जाऊन कार्य करतात, म्हणूनच समाजात परिवर्तन घडते, असेही ते म्हणाले. या कथेला मुख्य गायक विवेकजी महाराज गावंडे, बासरीवादक अभिनय महाराज, कृष्णा महाराज तसेच तबलावादक अक्षय महाराज मोरे यांनी सुरेल साथ दिली. नेकनूरमध्ये सुरू असलेली ही श्रीराम कथा पुढील काही दिवस भक्तिभावाने रंगणार असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत.

COMMENTS