पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा निकाल 5 किंवा 7 मे रोजी जाहीर होऊ शकतो.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच दहावीचा निकालही लागण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, 15 मेपूर्वी दहावीचा निकाल घोषित केला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राज्य मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या. या परीक्षांना मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले होते. परीक्षा संपल्यानंतर लगेचच निकालाबाबत उत्सुकता वाढली होती. सुरुवातीला एप्रिल अखेरपर्यंत बारावीचा निकाल लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मंडळातील काही कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे निकाल प्रक्रियेत विलंब झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एप्रिलअखेर अपेक्षित असलेला निकाल आता मेच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंडळातील वरिष्ठ अधिकार्यांकडूनही यासंदर्भात संकेत देण्यात आले आहेत. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांत दहावीचा निकाल लावण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. कारण, 17 मेपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्याआधी दहावीचा निकाल लागणे आवश्यक आहे, अन्यथा प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेत पूर्ण करून पुढील प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे निकाल जाहीर करण्यात थोडा विलंब झाला आहे.

COMMENTS