नांदेड : नांदेड शहरातील विनायक नगर परिसरात गेल्या काही काळापासून अपुर्या दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना

नांदेड : नांदेड शहरातील विनायक नगर परिसरात गेल्या काही काळापासून अपुर्या दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येच्या तातडीच्या निवारणासाठी महानगरपालिका प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विनायक सहकारी गृह निर्माण संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आयुक्त तसेच स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. विनायक नगर हाउसिंग सोसायटी हा शहरातील जुना वसाहती भाग असून येथील पाणीपुरवठा अद्याप वर्कशॉप परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीवर अवलंबून आहे. परिणामी रहिवाशांना अत्यल्प दाबाने पाणी मिळते, तर अनेकदा पाणीपुरवठा खंडित होण्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी पाणी मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, परिसरातील नंदीग्राम, विठ्ठलनगर, गोळेगावकर लेआऊट या भागांमध्ये नव्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असून तेथील नागरिकांना तुलनेने सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. मात्र, विनायक नगर सोसायटीला अद्याप या नव्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील पाणीटंचाई अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर विनायक नगर हाउसिंग सोसायटीचा पाणीपुरवठा नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीशी तातडीने जोडण्यात यावा, अशी मागणी संस्थेने केली आहे. यामुळे येथील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महानगरपालिकेने या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या निवेदनावर माजी नगरसेवक आनंद जाधव, संस्थेचे अध्यक्ष स. अमरप्रीतसिंघ जज, सचिव सतीश कळणे, सहसचिव बालाजी कदम, उषा तहाडे, सरुबाई धमणे, सुजाता मारलेवाड, सौ. ऐकाळे, मनोहर पोहरकर, टाक, योगेश चिंतावार तसेच नगरसेवक प्रतिनिधी महेश खोमणे, महेंद्र देमगुंडे आदीच्या स्वाक्ष -या आहेत.

COMMENTS