Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तक, इतिहास आणि धमकी !

जगभरात 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जात असतांना महाराष्ट्रातील शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत क

विरोधकांची हतबलता…
‘पेगासस’चे भूत
अवकाळीच्या नुकसानीपेक्षा राजकारणच महत्वाचे
The current image has no alternative text. The file name is: Agralekh-1.jpeg

जगभरात 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जात असतांना महाराष्ट्रातील शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिली आहे. वास्तविक पाहता संजय गायकवाड किती वाचता हा महत्वाचा प्रश्‍न आहे. कोणतंही अभ्यासपूर्ण वाचन नाही, चिंतन नाही, भाष्य नाही, असे असतांना या व्यक्तीने आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही, असे असतांना थेट धमकी देऊन गायकवाड यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे.
ही घटना केवळ एका पुस्तकावरील मतभेदाची नाही; ती आपल्या समाजाच्या बौद्धिक आरोग्याची, लोकशाही मूल्यांची आणि इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टीची कसोटी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती भावना असणे स्वाभाविक आहे. परंतु प्रश्‍न असा आहे की, या भावनांच्या आड इतिहासाचा अभ्यास गुदमरायला हवा का? गोविंद पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे चित्रण एका समतोल, अभ्यासपूर्ण आणि पुराव्यांवर आधारित दृष्टिकोनातून केले आहे. त्यांनी इतिहासकार गो. स. सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर, महादेव गोविंद रानडे यांसारख्या विद्वानांच्या अभ्यासाचा आधार घेतला आहे. म्हणजेच, हे पुस्तक कोणतीही सनसनाटी मांडणी करत नाही; उलट ते इतिहासाला वस्तुनिष्ठपणे समजून घेण्याचा प्रयत्न करते. याउलट छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व धर्मांचा आदर करणारे दाखवून देते. पुस्तकातील सर्वात चर्चेचा भाग म्हणजे शिवाजी महाराजांची धार्मिक भूमिका. पानसरे यांचे म्हणणे स्पष्ट आहे. शिवाजी महाराज हिंदू होते, धर्माभिमानी होते; पण ते कोणत्याही धर्मद्वेषाने प्रेरित नव्हते. कारण तशा इतिहासात नोंदी देखील उपलब्ध आहे. इतिहासातील अनेक नोंदी सांगतात की त्यांनी मशिदींना इनामे दिली, मुस्लिम संतांचा सन्मान केला, आणि युद्धाच्या काळातही स्त्रिया व धार्मिक स्थळांचे रक्षण करण्याचे कठोर आदेश दिले. हा दृष्टिकोन काहींना अस्वस्थ करणारा ठरतो, कारण तो आजच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाशी जुळत नाही. पण यामुळे तो खोटा ठरत नाही. या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्यासंबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी-बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, कल्याणकारी राज्य स्थापन केले, त्यांनी कधीही इतर धर्मांतील स्त्रीची अवहेलना केली नाही, तर उलट त्यांचा सन्मानच केला. त्यामुळे शत्रुच्या प्रदेशातील महिलांना देखील शिवाजी महाराजांबद्दल आदरच होता. असे असतांना आपल्या सोयीचा इतिहास मांडला नाही, म्हणून धमकी देणे, अयोग्य आहे. मतभेद असणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. पण मतभेद व्यक्त करण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. एखाद्या पुस्तकावर आक्षेप असल्यास त्यावर लेख लिहिता येतो, चर्चा घडवता येते, वादविवाद करता येतो. पण थेट धमकी देणे हे केवळ कायद्याच्या चौकटीबाहेरचे नाही, तर लोकशाहीच्या आत्म्यालाही छेद देणारे आहे.
आज जर एखाद्या लेखकाला किंवा प्रकाशकाला धमकी देऊन गप्प बसवले गेले, तर उद्या कुणीही इतिहासावर स्वतंत्रपणे लिहिण्याची हिंमत करणार नाही. ही परिस्थिती समाजाला अंधाराकडे नेणारी ठरू शकते. जागतिक पुस्तक दिनाचा उद्देश म्हणजे वाचनाची सवय वाढवणे आणि विचारांची देवाणघेवाण प्रोत्साहित करणे. पण आपण त्या दिशेने चाललो आहोत का? आज सोशल मीडियाच्या युगात अनेकजण पुस्तक न वाचताच त्यावर मत बनवतात. अफवा, अर्धवट माहिती आणि भावनिक प्रतिक्रिया यामुळे वातावरण तापते. ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक अवघ्या 73 पानांचे आहे. ते वाचून, त्यातील मुद्दे समजून घेतल्यानंतरच मत बनवणे अधिक योग्य नाही का? प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक विचारधारा शिवाजी महाराजांवर आपला हक्क सांगते. पण खरे पाहता, शिवाजी महाराज कोणाच्या मालकीचे नाहीत; ते सर्व समाजाचे आहेत. त्यांच्या कार्यातील सहिष्णुता, न्यायप्रियता आणि सर्वधर्मसमभाव हे गुण जर आपण स्वीकारले, तरच आपण त्यांचे खरे वारस ठरू. पण जर त्यांच्या नावाचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी किंवा द्वेष पसरवण्यासाठी केला, तर ते त्यांच्या विचारांशीच विश्‍वासघात ठरेल. इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसतो; तो वर्तमान घडवण्याचे साधन असतो. त्यामुळेच इतिहासाचे राजकारण होते. पण इतिहासाचा वापर करताना जबाबदारीही तितकीच मोठी असते. निवडक घटनांचा आधार घेऊन एकतर्फी चित्र उभे करणे, किंवा अस्वस्थ करणार्‍या सत्यांना दडपणे-ही पद्धत समाजाला दिशाभूल करणारी ठरते. गोविंद पानसरे यांचे पुस्तक हे अशा एकतर्फी मांडणीला प्रश्‍न विचारते. त्यामुळेच कदाचित ते काहींना अस्वस्थ करते. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते-आपल्या समाजात संवादाची कमतरता आहे. मतभेद असतीलच, पण त्यावर उपाय म्हणजे संवाद, चर्चा आणि तर्क. धमकी, दडपशाही आणि भावनिक उद्रेक हे उपाय नाहीत. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण स्वतःला एक प्रश्‍न विचारायला हवा-आपण वाचन आणि विचारांच्या बाजूने उभे आहोत का, की भीती आणि गप्प बसवण्याच्या संस्कृतीकडे झुकत आहोत? जर समाज म्हणून आपल्याला प्रगल्भ व्हायचे असेल, तर पुस्तकांना घाबरणे सोडून त्यांच्याशी संवाद साधायला हवा. कारण शेवटी, विचारांना गोळ्या घालून मारता येत नाही, ते केवळ अधिक ताकदीने परत येतात.

COMMENTS