नांदेड : श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या विटंबनेला आळा घालण्यासाठी पंजाब शासनाने 13 एप्रिल रोजी विधानसभेत महत्त्वपूर्ण कायदा मंजूर केला. या निर्णया

नांदेड : श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या विटंबनेला आळा घालण्यासाठी पंजाब शासनाने 13 एप्रिल रोजी विधानसभेत महत्त्वपूर्ण कायदा मंजूर केला. या निर्णयामुळे शीख समाजात समाधान व्यक्त होत असून, यास वैसाखी पर्वाची विशेष भेट मानली जात आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पुढाकारातून पारित झालेल्या या कायद्यानुसार, श्री गुरु ग्रंथ साहिब यांची विटंबना करणार्यांना जन्मठेपेची शिक्षा तसेच 25 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाचे नांदेडमध्ये स्वागत करण्यात आले. सोमवारी सायंकाळी आम आदमी पक्षाच्या नांदेड शाखेच्या वतीने तख्त सचखंड श्री हजूर साहिब समोर जल्लोष करत मिठाई वाटप करण्यात आले. या प्रसंगी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सरदार नरेंद्रसिंह ग्रंथी, जिल्हा सचिव अवधूत पवार, शहराध्यक्ष देविदास शिंदे, तसेच सरदार बीरेंद्रसिंह बेदी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते. यावेळी पंजाबमधून आलेल्या भाविकांनीही आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्णयाचे कौतुक केले. नांदेड येथे श्री गुरु ग्रंथ साहिब यांना गुरुगादी मिळाल्याने हा निर्णय स्थानिक पातळीवर अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. तसेच, महाराष्ट्रातही पंजाबप्रमाणेच कायदा लागू करावा, अशी मागणी सरदार नरेंद्रसिंह ग्रंथी व अवधूत पवार यांनी केली. महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानाच्या घटना वाढत असल्याने अशा प्रकारचा कडक कायदा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS