Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणाच्या माहेरघरात आता ’नशेची’ गंगा? गोकुंद्यात नव्या ’बार’साठी हालचाली; ग्रामपंचायत प्रशासनाची ’अर्थपूर्ण’ डोळेझाक!

किनवट : शिक्षणाचे माहेरघर आणि ज्ञानाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गोकुंदा शहराचे नाव आता लवकरच ’मद्यनगरी’ म्हणून लौकिक मिळवते की काय, अशी भीती सुज

पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४
पुण्यात विषारी दारूचा तांडव! १५ जणांचा मृत्यू; मुख्य आरोपीसह ८ जणांना बेड्या। लोकमंथन News२४
अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम

किनवट : शिक्षणाचे माहेरघर आणि ज्ञानाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गोकुंदा शहराचे नाव आता लवकरच ’मद्यनगरी’ म्हणून लौकिक मिळवते की काय, अशी भीती सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अगोदरच चार बिअर बार, एक बिअर शॉपी आणि एका देशी दारूच्या गुत्त्याने शहराला वेढा घातलेला असताना, आता त्यात अजून एका नवीन ’बार’ची भर पडणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नव्या परवान्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ’अर्थपूर्ण’ व्यवहार करून हिरवा कंदील दाखवल्याची कुजबूज सध्या गल्लीबोळांत ऐकायला मिळत आहे.
गोकुंद्यात सध्या अधिकृत मद्यविक्री केंद्रांची संख्या पुरेशी असतानाही, गल्लीबोळात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना, प्रशासनाने यावर लगाम घालणे अपेक्षित होते. मात्र, परिस्थिती उलटीच दिसत आहे. एकीकडे पुस्तकांचे ओझे पेलणारी मुले आणि दुसरीकडे बाटल्यांचा खणखणाट असे विदारक चित्र गोकुंद्यात पाहायला मिळत आहे. एका बाजूला शहर विकासाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे मद्यविक्रीच्या परवान्यांसाठी रेड कार्पेट अंथरायचे, असा दुटप्पी धोरण ग्रामपंचायत प्रशासनाकडून राबवले जात असल्याचा आरोप होत आहे. नवीन बारला परवानगी देण्यासाठी जे ’अर्थपूर्ण’ संबंध जोडले गेल्याची चर्चा आहे, त्यावरून प्रशासनाचा प्राधान्यक्रम शिक्षणाऐवजी ’नशेच्या व्यापारा’ला असल्याचे स्पष्ट होत आहे. आधीच असलेल्या बारमुळे शहरात शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्लीबोळातील अवैध दारू बंद करण्याऐवजी प्रशासनाला अजून एका नवीन बारची गरज का भासली? हा निर्णय लोकांच्या हिताचा आहे की फक्त काही ’ठराविक’ लोकांच्या खिशासाठी? हा नागरिकांचा सवाल आहे. गोकुंदा हे शैक्षणिक केंद्र असल्याने येथे बाहेरून येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा वातावरणात दारूची दुकाने फोफावणे हे पालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. विशेषतः महिला वर्गातून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, जर ग्रामपंचायतीने हा ’अर्थपूर्ण’ हव्यास थांबवला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे. आता पाहायचे हे की, ग्रामपंचायत प्रशासन जनभावनेचा आदर करून हा निर्णय मागे घेते की, लक्ष्मीच्या पाऊलखुणांच्या नादात शहराच्या शैक्षणिक वारशाला तिलांजली देते?

COMMENTS