बीड : मुस्लिम समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 17 एप्रिल रोजी बीड शहरात आयोजित करण्यात

बीड : मुस्लिम समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 17 एप्रिल रोजी बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा व आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) ‘तुतारी’च्या सर्व नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय आणि सामाजिक वातावरणाला वेग आला आहे.
मुस्लिम समाज हा अनेक वर्षांपासून शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्याचे विविध आयोग व समित्यांच्या अहवालांमधून स्पष्ट झाले असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. तसेच पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचेही नमूद केले जात आहे. उच्च न्यायालयानेही मुस्लिम समाजातील मागासलेपण लक्षात घेऊन आरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने 17 एप्रिल रोजी बीड येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनाला ‘तुतारी’ गटातील सर्व नगरसेवकांनी एकत्रित पाठिंबा जाहीर केला आहे. बीड शहर विकास आघाडीचे गटनेते तथा शहराध्यक्ष खुर्शीद आलम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीला न्याय मिळावा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवला आहे. या पाठिंबा देणार्या नगरसेवकांमध्ये अशोक काळे, शेख बब्बु, अक्षय जाधव, शेख रईस, रंजीत पिंगळे, अय्युब खान, शेख अफसर, उल्हास ग्राम, मसुद खान, शेख रोहिल, भारत कांबळे, मसी भाई आणि मोहसीन मोमीन यांचा समावेश आहे. नगरसेवकांच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात, बीड शहरातील नागरिकांनी तसेच विविध सामाजिक घटकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले आहे. हा मोर्चा शांततामय आणि लोकशाही मार्गाने पार पडावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे शहरात राजकीय चर्चा आणि हालचाली वाढल्या असून, विविध पक्ष व संघटनांचे लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.

COMMENTS