बीड : बीड जिल्ह्यात अलीकडील काळात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळसह गंभीर गुन्ह्यांवर तातडीने

बीड : बीड जिल्ह्यात अलीकडील काळात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जाळपोळसह गंभीर गुन्ह्यांवर तातडीने आणि ठोस कारवाई करण्याची मागणी बीड जिल्हा कृती समितीने केली आहे. तसेच निनावी पत्रांच्या माध्यमातून प्रशासनाविषयी अविश्वास निर्माण करून समाजात भीती पसरवण्याच्या प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा सामाजिक अस्वस्थतेच्या छायेत वावरत असून, जाळपोळ प्रकरणांमध्ये अपेक्षित प्रभावी कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे समितीने म्हटले आहे. दरम्यान, खून, दरोडे, अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. निनावी पत्रांच्या माध्यमातून समाजात भीती, संभ्रम आणि अविश्वास निर्माण करण्याचा प्रकार वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला असून, अशा प्रकरणांचा तांत्रिक तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे. जिल्ह्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता व्यक्त करत, जाळपोळ व इतर गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी बीड जिल्हा कृती समितीच्या वतीने डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर), रामनाथ खोड, शेख युनुस, माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील, रामधन जमाले, सय्यद सादेक, सुहास जायभाये, किश्किंधा पांचाळ आदी सदस्यांनी केली आहे.

COMMENTS