Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता गलधर यांचा गलथान कारभार पुन्हा उघड; गुरुद्वारा मार्गाचे काम 100 दिवसांपासून ठप्प

नांदेड : नांदेड शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कार्यकारी अभियंता गलधर यांच्य

नांदेड दक्षिण मतदारसंघात 20 कोटी 70 लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक
आ. बोंढारकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नांदेड शहर-ग्रामीणमधील 29 हजार शेतकर्‍यांसाठी 24. 50 कोटींचा पिक विमा मंजूर

नांदेड : नांदेड शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कार्यकारी अभियंता गलधर यांच्या गलथान कारभाराचा ठळक नमुना चिखलवाडी कॉर्नर ते गुरुद्वारा या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातून समोर आला आहे. तब्बल 100 दिवसांपासून हे काम ठप्प पडले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका थेट भाविक, नागरिक आणि व्यापार्‍यांना बसत आहे.
जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा येथे दररोज हजारो भाविक देशभरातून तसेच विदेशातून दर्शनासाठी येतात. या भाविकांसाठी चिखलवाडी ते गुरुद्वारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. मात्र, याच रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. खोदकाम करून ठेवलेला रस्ता, उडणारी धूळ, आणि सर्वत्र पसरलेला खडी-मातीचा ढिगारा यामुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
विशेष म्हणजे, या काळात कोणतीही ठोस कामगिरी न करता संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडत आहे. प्रत्यक्षात मात्र काम सुरू करण्याची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. यामुळे कार्यकारी अभियंता गलधर यांच्या नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभारावर तीव्र टीका होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या वैसाखी उत्सवादरम्यान या समस्येची तीव्रता अधिकच जाणवली. हजारो शीख भाविक गुरुद्वारात दर्शनासाठी आले असताना त्यांना अत्यंत त्रासदायक परिस्थितीतून जावे लागले. रस्ता बंद असल्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला, परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. गेट क्रमांक 3 व 4 परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्राहकांची वर्दळ कमी झाल्यामुळे व्यापार जवळपास ठप्प झाला असून, अनेकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. रस्ता खोदून ठेवला, पण काम सुरूच नाही. आमचा व्यवसाय बुडत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक व्यापार्‍यांनी दिली. गुरु खालसा संस्थेचे प्रतिनिधी काश्मीरसिंग भट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना निवेदन देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही, तर भाविकांच्या सुरक्षेचा आणि शहराच्या प्रतिष्ठेचा आहे. दरम्यान, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेत, काम तात्काळ सुरू करण्याचे आणि ठराविक मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही प्रत्यक्षात काम सुरू होईल का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गलधर यांच्या नेतृत्वाखालील कामकाजावर आधीही अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियोजनाचा अभाव, कामातील दिरंगाई आणि देखरेखीची कमतरता यामुळे अनेक प्रकल्प रखडल्याचे चित्र आहे. तरीही याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे नांदेड हे धार्मिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते, तर दुसरीकडे अशा मूलभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष शहराच्या प्रतिमेला धक्का देणारे ठरत आहे. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना, त्या बाबतीत होत असलेली निष्क्रियता अत्यंत चिंताजनक आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच संबंधित अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, जनतेचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS