संगमनेर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला असून नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मारक उभारणीस

संगमनेर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचला असून नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मारक उभारणीसंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे.
शहरात शिवस्मारक उभारण्याचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत नगरपालिकेकडे जागा वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने संगमनेर बसस्थानकासमोरील जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली.
या स्मारकासाठी जागा मिळविण्याचा प्रयत्न २०१८ पासून सुरू होता. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात बसस्थानक परिसरातील जागा स्मारकासाठी मिळावी यासाठी नगरपालिकेने प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर महसूलमंत्री असताना बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव मंत्रालयात पुढे नेला.
दरम्यान, २०२३ मध्ये आ. तांबे निवडून आल्यानंतर त्यांनी या प्रश्नाला पुन्हा गती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष बाब म्हणून निर्णय व्हावा, असा आग्रह धरला. त्यानुसार अखेर स्मारकासाठी जागा उपलब्ध झाली.
जागा निश्चित झाल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ५ ते ७ मार्चदरम्यान “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कसे असावे?” याबाबत नागरिकांमधून मतदान घेण्यात आले.
जाहीर झालेल्या निकालानुसार पूर्णाकृती अश्वारूढ स्मारकाला सर्वाधिक ६ हजार ५६४ मते मिळाली. उभ्या स्मारकाला ४ हजार ७६१, तर सिंहासनाधीश्वर स्मारकाला ७६१ मते मिळाली. एकूण १२ हजार ८६ नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदवला.या निकालाच्या आधारे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अश्वारूढ स्मारक उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

COMMENTS