निघोज : राज्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मळगंगा देवीच्या घागरीच्या दर्शनासाठी निघोज येथे लाखोंच्या संख्येने भाविकांनी मोठी गर्दी

निघोज : राज्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मळगंगा देवीच्या घागरीच्या दर्शनासाठी निघोज येथे लाखोंच्या संख्येने भाविकांनी मोठी गर्दी केली. शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता हेमांडपंथी बारवेत देवीच्या घागरीचे दर्शन झाले. त्यानंतर मध्यरात्री मानकऱ्यांच्या हस्ते घागरीची महापूजा करण्यात आली.
शनिवारी सकाळी ७ वाजता घागरीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी “माता मळगंगा देवीच्या जयजयकार”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. हेमांडपंथी बारव ते मंदिर आणि पुन्हा बारव असा मिरवणुकीचा मार्ग होता. अवघ्या ३०० मीटर अंतरासाठी दोन तासांचा कालावधी लागला, यावरून भाविकांची उपस्थिती स्पष्ट झाली.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी भाविकांनी घागरीवर पुष्पवृष्टी केली. तसेच मंदिर परिसर व ग्रामपंचायत चौकात ड्रोनच्या माध्यमातूनही पुष्पवृष्टी करण्यात आली. मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर गायखे कुटुंबातील सवाष्णींनी पारंपरिक पद्धतीने घागरीचे औक्षण केले. यावेळी भाविकांनी उत्स्फूर्त जयजयकार केला.
शनिवारी (दि. ११) देवीच्या दर्शनासाठी दिवसभर मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी चार वाजता छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कुंडावर पोहोचल्यावर यात्रेला प्रारंभ झाला. काठी शिखराला लागल्यानंतर कुंडाची यात्रा सुरू होत असून दोन दिवस ही यात्रा सुरू राहते.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे खेळणी, मिठाई, पाळणे तसेच शेतीसाहित्याची मोठ्या प्रमाणात दुकाने येथे भरतात. विशेषतः महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करून यात्रेचा आनंद लुटतात. रविवारी (दि. १२) दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत कुस्ती हंगामाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे. रात्री किरणकुमार ढवळपुरीकर यांच्या लोकनाट्याचाही कार्यक्रम होणार आहे.मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, यात्रा समिती, ग्रामपंचायत व समस्त निघोज ग्रामस्थांनी या यात्रेसाठी परिश्रम घेतले.

COMMENTS