जेरुसलेम : मध्यपूर्वेत संघर्ष कमी होण्याऐवजी आणखी तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबनानमधील किमान दोन गावांवर हवाई

जेरुसलेम : मध्यपूर्वेत संघर्ष कमी होण्याऐवजी आणखी तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबनानमधील किमान दोन गावांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाया अशा वेळी घडल्या आहेत, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेली युद्धविरामाची स्थिती पुढे टिकवण्यासाठी चर्चेची तयारी सुरू आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना लेबनानवरील हल्ल्यांची तीव्रता कमी करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात असतानाच ही कारवाई झाल्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. लेबनानमधील इराण समर्थित संघटना हिजबुल्लाहनेही प्रत्युत्तरात्मक हालचाली केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर इस्रायलमधील काही भागांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. सीमाभागातील काही ठिकाणे, विशेषतः किर्यात शमोना आणि अपर गॅलिली परिसरातील भाग, या हल्ल्यांच्या कक्षेत आल्याचे सांगितले जाते. हिजबुल्लाहने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात इस्रायल आणि अमेरिकेकडून सुरू असलेल्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्या देशावर आणि नागरिकांवर होणार्या हल्ल्यांना प्रतिसाद देणे अपरिहार्य आहे. आक्रमकता थांबेपर्यंत आमची कारवाई सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एकीकडे इराण-अमेरिका यांच्यातील युद्धविराम टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे सीमाभागात वाढणार्या लष्करी हालचाली आणि हल्ल्यांमुळे या प्रयत्नांवर दबाव वाढत आहे. परिणामी, संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS