नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केवळ उत्सव साजरा करण्यापेक्षा गेल्या शतकभरातील कार्याचा धांडोळा घेऊन पुढील वाटचालीचे द

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केवळ उत्सव साजरा करण्यापेक्षा गेल्या शतकभरातील कार्याचा धांडोळा घेऊन पुढील वाटचालीचे दिशादर्शन करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर झालेल्या ‘राष्ट्र स्वराधना’ या घोष पथकाच्या हस्तलिखित इतिहासग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
सरसंघचालकांनी स्पष्ट केले की, संघकार्याचा प्रवास कोणाच्या कृपेवर अवलंबून नसून स्वयंसेवकांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातूनच तो घडला आहे. शंभर वर्षांचा हा प्रवास प्रेरणादायी असून त्यातून आत्मपरीक्षणाची संधी मिळते. ‘सिंहासन बत्तीसी’मधील कथांप्रमाणे प्रत्येक पिढीने आपल्या पूर्वजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. पूर्वजांनी घालून दिलेला पाया जतन करण्याबरोबरच तो अधिक भक्कम आणि व्यापक करण्याची जबाबदारी आजच्या स्वयंसेवकांवर असल्याचे त्यांनी सांगितले. संघाचे विविध उपक्रम हे समाजात संस्कार रुजवण्यासाठीच राबवले जातात, असे सांगताना त्यांनी सुदृढ शरीर आणि संस्कारित मन यांची सांगड घालणे हे संघाचे प्रमुख ध्येय असल्याचे अधोरेखित केले. ‘राष्ट्र स्वराधना’ या ग्रंथाद्वारे घोष पथकाच्या कार्याचा इतिहास जतन करण्याचा प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. संघाच्या कार्यामागे स्वतःचे नाव उज्ज्वल करणे हा उद्देश नसून समाज, राष्ट्र आणि जनतेचे योगदानच या प्रवासाचे खरे श्रेय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. घोष पथकातील विविध वाद्यांच्या उदाहरणातून समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक वाद्याचा स्वर वेगळा असला तरी सर्वजण एकाच तालात कार्य करतात, यामुळे एकात्मतेची भावना दृढ होते. हीच भावना समाजजीवनातही रुजणे आवश्यक आहे. ‘सत्यम-शिवम-सुंदरम’ हे भारतीय जीवनमूल्य असल्याचे सांगून त्यांनी प्रत्येक कार्य मनःपूर्वक केल्यास त्यातून सत्य, मंगल आणि सौंदर्याची अनुभूती निर्माण होते, असे स्पष्ट केले. समाजात ही मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी संघटित आणि व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

COMMENTS