Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कारवाईचा देखावा की प्रशासनाचे अपयश? नायगावात वाळूमाफियांचा पुन्हा हैदोस

नांदेड : नायगाव तालुक्यातील अंतरगाव परिसरात अवैध वाळू उपसा पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून, प्रशासनाच्या कारवाईनंतरही वाळू माफियांचे मनोबल

तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
तहसीलदार स्व. राकेश गिड्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण

नांदेड : नायगाव तालुक्यातील अंतरगाव परिसरात अवैध वाळू उपसा पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत असून, प्रशासनाच्या कारवाईनंतरही वाळू माफियांचे मनोबल अजिबात खचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले, उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपतेवार आणि नायगावचे तहसीलदार डॉ. धर्मप्रिय गायकवाड यांनी संयुक्त धडक कारवाई करत तीन बोटी उडवल्या होत्या. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही अपेक्षा फार काळ टिकली नाही.
कारवाईनंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांतच पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, आता हा उपसा केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्याही सुरू असल्याने वाळू माफियांची बेधडक वृत्ती स्पष्ट होत आहे. नदीपात्रातून खुलेआम वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात असून, प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी अडथळा निर्माण होताना दिसत नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराबाबत संबंधित महसूल व पोलीस अधिकार्‍यांना वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असून, तक्रारींवर ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढीस लागली आहे. काही प्रकरणांमध्ये अधिकार्‍यांकडून फोन उचलले जात नाहीत किंवा माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते, अशीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महसूल विभागाच्या काही अधिकार्‍यांवर संशयाची सुई फिरू लागली आहे. वाळू माफियांना मिळणारे कथित ‘मौन समर्थन’ ही चर्चा आता परिसरात उघडपणे होऊ लागली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाळू माफियांना जणू मोकळे रान मिळाले असून, नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे.
दरम्यान, तहसील प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका बाजूला पोलिसांकडून बोटी उडवून कारवाई केल्याचे दाखवले जाते, तर दुसर्‍या बाजूला त्यानंतर लगेचच वाळू माफिया पुन्हा काम सुरू करतात, यामुळे ही कारवाई केवळ दिखावा तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. मी करतो मारल्यावाणी आणि तुम्ही करा रडल्यावाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. परिसरातील पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असतानाही प्रशासनाकडून कठोर व सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता तरी प्रशासनाने ठोस पावले उचलून या अवैध वाळू उपशावर कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

COMMENTS