Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कच्च्या तेलाच्या किमती 17 टक्क्यांनी घसरल्या

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या युद्धविरामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच

दोन जहाजांद्वारे इराणी तेल भारतात‘फेलिसिटी’ आणि ‘जया’जहाजे भारतीय बंदरांत दाखल
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला भेट
युद्धबंदी औट घटकेची न ठरो ?

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या युद्धविरामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. या घडामोडीनंतर कच्चे तेल सुमारे 17 टक्क्यांनी स्वस्त झाले असून जागतिक ऊर्जा बाजाराला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
युद्धविरामाच्या घोषणेनंतर जागतिक बाजारातील प्रमुख निर्देशांकांनुसार कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. मागील सत्रात उच्चांकावर पोहोचलेले दर खाली आले असून गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात स्थैर्य निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील वीज आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणार्‍या संभाव्य हल्ल्यांना दोन आठवड्यांची स्थगिती जाहीर केली. तसेच इराणसोबत महत्त्वाच्या मुद्यांवर तात्पुरता करार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कराराचा एक भाग म्हणून होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पुन्हा खुली करण्याबाबत इराणने सकारात्मक भूमिका घेतल्याचेही संकेत मिळाले आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक होतो. मात्र, अलीकडील संघर्षामुळे या मार्गावरील पुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली होती. युद्धविरामामुळे या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मते, ही घसरण कायमस्वरूपी राहील असे मानणे योग्य ठरणार नाही. युद्धामुळे तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. बंद पडलेल्या विहिरी पुन्हा सुरू करणे, कामगारांची पुनर्नियुक्ती करणे आणि साठा उभारणे यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ उच्च राहिल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा दबाव वाढू शकतो. चालू खात्यातील तूट वाढणे, चलनावर ताण येणे आणि महागाईत वाढ होणे असे परिणाम दिसू शकतात. याशिवाय परकीय गुंतवणुकीवरही परिणाम होऊन बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. एकूणच, युद्धविरामामुळे सध्या दिलासा मिळाला असला तरी परिस्थिती अद्याप नाजूक आहे. जागतिक घडामोडींवर तेलबाजाराचे भवितव्य अवलंबून राहणार असून पुढील काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत.

COMMENTS