मुंबई : राज्यात खळबळ उडवून देणार्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. उच्चपदस्थ महिला पोलिस अधिकारीही खरातच्या संपर्का

मुंबई : राज्यात खळबळ उडवून देणार्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. उच्चपदस्थ महिला पोलिस अधिकारीही खरातच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त होत असून, या अधिकार्यांनी पसंतीच्या बदलीसाठी त्याची मदत घेतल्याची शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहे. या प्रकरणात उपपोलिस आयुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी काही काळ नाशिक येथे महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांनी अशोक खरातशी संपर्क ठेवत काही प्रशासकीय कामांमध्ये त्याला नियमबाह्य मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बदल्यात खरातने आपल्या संपर्क जाळ्याचा वापर करून या अधिकार्यांना इच्छित ठिकाणी बदली मिळवून देण्यात भूमिका बजावली असावी, अशी शक्यता तपासात व्यक्त होत आहे. या व्यवहारांपुरते प्रकरण मर्यादित नसून, आर्थिक देवाणघेवाणीचे धागेदोरेही समोर येत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी केवळ बदलीसाठीच नव्हे, तर इतर कारणांसाठीही खरातशी संबंध ठेवले होते का, याचा सखोल तपास सुरू आहे. तांत्रिक पुरावे आणि संपर्क नोंदींच्या आधारे विशेष तपास पथक या प्रकरणातील कड्या जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. भोंदू अशोक खरातविरोधात आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. यात महिलांच्या शोषणासह आर्थिक फसवणूक आणि गैरव्यवहारांचे आरोप समाविष्ट आहेत. या प्रकरणात राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रातील काही नावांचा उल्लेख होत असल्याने तपास अधिक संवेदनशील बनला आहे. विशेष म्हणजे, चौकशीदरम्यान खरातने महिलांची फसवणूक करण्यासाठी हातचलाखी आणि भीतीचे वातावरण निर्माण केल्याची कबुली दिल्याची माहिती पुढे येत आहे. तथाकथित चमत्कार किंवा वशीकरणाच्या नावाखाली तो महिलांना जाळ्यात ओढत असल्याचेही तपासातून स्पष्ट होत आहे.

COMMENTS