नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, त्याचे परिणाम आता थेट सर्वस

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून, त्याचे परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर जाणवू लागले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 115 डॉलरच्या पुढे गेल्याने जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दिवसभरातील व्यवहारात ब्रेंट प्रकारातील कच्च्या तेलाच्या दरात सुमारे 1.70 डॉलरची वाढ होऊन ते 110 डॉलरच्या पुढे स्थिरावले. त्याचवेळी वेस्ट टेक्सास प्रकारातील कच्च्या तेलानेही 115 डॉलरचा टप्पा ओलांडला. या वाढीमुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाचे दर जर दीर्घकाळ 100 डॉलरच्या पुढे राहिले, तर देशातील महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा जास्त जाऊ शकतो. महागाई वाढल्यास सर्वसामान्यांच्या खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध, इंधन, वीज, वाहतूक यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि सेवांचे दर वाढू शकतात. पेट्रोल आणि डिझेल हे शेती, उद्योग, वाहतूक आणि वीज निर्मिती या क्षेत्रांचे प्रमुख आधार आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम केवळ इंधनापुरता मर्यादित राहत नाही, तर उत्पादन खर्च वाढवून वस्तूंच्या अंतिम किमतीतही वाढ घडवतो. याचा थेट फटका ग्राहकांना बसतो. दरवाढीमागे पश्चिम आशियातील संघर्ष, विशेषतः महत्त्वाच्या समुद्री मार्गांवरील तणाव आणि पुरवठ्यातील अडथळे ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. समुद्री वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्याने तेलपुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय जागतिक राजकीय घडामोडींमुळेही बाजारात अनिश्चितता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला असून, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास इंधनदरवाढ, महागाई आणि आर्थिक वाढीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकूणच, कच्च्या तेलाच्या किमतीतील ही वाढ तात्पुरती न राहता दीर्घकाळ टिकल्यास देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असून, सरकारसमोरही आर्थिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान उभे राहू शकते.

COMMENTS