हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा आज पहिला स्मृतिदिन. मागील वर्षी ४ एप्रिल २०२५ रोज

हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा आज पहिला स्मृतिदिन. मागील वर्षी ४ एप्रिल २०२५ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली होती. मनोज कुमार हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेले कलाकार होते. त्यांनी निर्माण केलेले आणि अभिनय केलेले दशभक्तीवरील चित्रपट त्याकाळात खूप गाजले होते. मेरे देश की धरती…, सरफरोशी की तमन्ना…., एक प्यार का नगमा है…., पाणी रे पाणी तेरा रंग कैसा… अशी अनेक अजरामर गाणी मनोज कुमार यांच्यावर चित्रित झाली आहेत. आजही स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटातील गाणी आवर्जून वाजवली जातात.
मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी झाला. मनोज कुमार यांचे खरे नाव हरकिशन गिरी स्वामी असे होते. मनोज कुमार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. दिलीप कुमार हे त्यांचे आवडते अभिनेते होते. त्यांच्यावर दिलीप कुमार यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी मनोज कुमार हे नाव धारण करण्यामागेही दिलीप कुमार हेच होते. शबनम या चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेल्या पात्राचे नाव मनोज कुमार असे होते. या चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेले मनोज कुमार हे पात्र त्यांना इतके भावले की त्यांनी स्वतःचे नाव मनोज कुमार असेच ठेवले. १९५७ साली शहीद चित्रपटाद्वारे मनोज कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील त्यांनी भगतसिंग यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.
आपला पहिलाच देशभक्तीपर चित्रपट यशस्वी झाल्याने त्यांनी पुढे अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली. मनोज कुमार यांनी उपकार या देशभक्तीपर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान…जय किसान…. हा नारा त्यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट त्या काळात खूप गाजला. या चित्रपटातील गाणी तर खूप गाजली. मेरे देश की धरती…. हे अजरामर गाणे याच चित्रपटातले. उपकार नंतर पुरब और पश्चिम, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती, हिमालय की गोद में या देशभक्तीपर चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली हे सर्व चित्रपट खूप गाजले. या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजवण्याचा प्रयत्न केला. मनोज कुमार यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली म्हणून त्यांना भारतकुमार हे टोपण नाव पडले. त्यांनी निर्माण केलेले आणि अभिनय केलेले देशभक्तीवरील चित्रपट खूप गाजले होते.
शोर, पत्थर के सनम, दो बदन, मेरा नाम जोकर हे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट देखील खूप गाजले. मनोज कुमार यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. उपकार या चित्रासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २००५ साली चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. १९९२ साली भारत सरकारने पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवले. मनोज कुमार यांनी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला असेच म्हणावे लागेल. मनोज कुमार यांचा सारखा कलाकार पुन्हा होणार नाही. प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजवणारे जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना पहिल्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

COMMENTS