अकोले : दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त करावे, अशी मागणी अकोले दिव्यां

अकोले : दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त करावे, अशी मागणी अकोले दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुकाराम मुंढे हे दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या, पदोन्नती, विविध कंत्राटे व परवाने मिळविणाऱ्यांवर त्यांनी कारवाई करत अनेक गैरप्रकार उघडकीस आणले आहेत.
तसेच दिव्यांगांच्या नावाखाली संस्था व शाळा चालवून कोट्यवधी रुपयांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. राज्यभरातील दिव्यांगांच्या नावाने होत असलेल्या विविध घोटाळ्यांचा पर्दाफाश करून लाखो दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत असून त्यांची बदली तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही माहिती दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष गणपत घुमाळ यांनी दिली.

COMMENTS