Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेलांची ‘दांडी’!

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौर्

गेमिंग प्लॅटफॉर्म गेम्सक्राफ्टच्यातीन संस्थापकांना ईडीने केली अटक
..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी
खा. सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौर्‍यादरम्यान वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांची गुरूवारी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षात सर्व काही सुरळीत आहे का, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
दिल्लीतील कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी प्रफुल पटेल यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता, ते कधी येतात, कधी जातात हे तुम्हालाच माहिती असेल, असा टोला सुनेत्रा पवार यांनी लगावला. त्यांच्या या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये कुजबुज वाढली आणि विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. अलीकडील काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरूच आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर काही बदल घडताना दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवरच काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणांबाबत आधीच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. याच दरम्यान, प्रफुल पटेल दिल्लीमध्ये उपस्थित असल्याची माहिती समोर येत असतानाही ते सुनेत्रा पवारांसोबत दिसले नाहीत. दुसरीकडे, सुनील तटकरे हे धार्मिक कार्यक्रमानिमित्त रायगडमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पक्षातील दोन महत्त्वाचे नेते एकाच वेळी अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना अधिकच धार मिळाली आहे. पक्षाच्या अंतर्गत प्रक्रियेबाबतही नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नोंदींमध्ये पक्षाच्या संविधानात बदल झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र देत काही नोंदी रद्द करण्याची मागणी केल्याचेही कळते. या घडामोडींमुळे पक्षाच्या निर्णयप्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल
पक्षाच्या नव्या संविधानातही लक्षणीय बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्वी विविध घटकांना प्रतिनिधित्व देणारे अनेक विभाग अस्तित्वात होते. मात्र नव्या रचनेनुसार युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या चार प्रमुख विभागांपुरतेच संघटन मर्यादित करण्यात आले आहे. या बदलांचा पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि भविष्यातील धोरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS