अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महिन्याच्या युद्धानंतर पुढील दोन-तीन आठवड्यात युद्ध संपू शकते, असं म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महिन्याच्या युद्धानंतर पुढील दोन-तीन आठवड्यात युद्ध संपू शकते, असं म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे दिलासा मिळत असला तरी, या युद्धात जी काही राखरांगोळी झाली, ज्या भळभळत्या जखमा झाल्या, ज्या वेदना नागरिकांना झाल्या, त्या जखमांचे काय? अनेकांनी आपले प्रियजन या युद्धात गमावले. त्यामुळे युद्धानंतरची शांतता ही भयावह आणि कू्रर असते.
मध्यपूर्वेतील संघर्षाचा इतिहास हा केवळ सीमारेषांचा किंवा संसाधनांचा वाद नाही, तर तो विश्वासघात, संशय आणि राजनैतिक अपयश यांच्या गुंतागुंतीतून घडलेला आहे. आज इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव हे याच दीर्घ प्रक्रियेचे परिणाम आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट शब्दांत अमेरिकेवरील विश्वास पूर्णपणे उडाल्याचे जाहीर केले आहे. हा केवळ एक राजनैतिक वक्तव्य नसून, दोन देशांमधील तुटलेल्या नात्याचे प्रकटीकरण आहे. 2015 च्या अणुकराराचा संदर्भ येथे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. इराण अणुकरार या कराराने एकेकाळी आशेची किरणे दाखवली होती. इराणने आपल्या अणुकार्यक्रमावर निर्बंध स्वीकारले, तर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध शिथिल करण्याचे आश्वासन दिले. परंतु, अमेरिकेने एकतर्फी माघार घेतल्याने हा करार कोलमडला. या घटनेने इराणच्या दृष्टीने अमेरिकेची विश्वासार्हता धुळीस मिळाली. परिणामी, आज कोणत्याही नव्या चर्चेला इराणकडून शंका आणि अविश्वासानेच पाहिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपण्याबाबत केलेले विधान महत्त्वाचे ठरते. त्यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत संघर्ष समाप्त होऊ शकतो, असा दावा केला आहे. त्यांच्या मते, इराणला अण्वस्त्र प्राप्त होण्यापासून रोखणे हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. परंतु, या दाव्यांमध्ये वास्तवापेक्षा राजकीय संदेश अधिक दिसतो. कारण युद्ध हे केवळ लष्करी कारवाईने संपत नाही; त्यासाठी विश्वास, संवाद आणि परस्पर समज आवश्यक असते. आज परिस्थिती अशी आहे की, थेट संवादाऐवजी ‘मित्र राष्ट्रांमार्फत संदेशांची देवाणघेवाण’ सुरू आहे. ही स्थिती आंतरराष्ट्रीय संबंधांतील अपयशाचे द्योतक आहे. संवादाचा अभाव म्हणजे गैरसमजांना खतपाणी मिळणे आणि संघर्ष अधिक तीव्र होणे. त्यामुळे, युद्ध संपण्याच्या घोषणांपेक्षा शांततेच्या प्रक्रियेला गती देणे अधिक गरजेचे आहे. या युद्धाचे परिणाम केवळ रणांगणापुरते मर्यादित नाहीत. तर संपूर्ण मध्यपूर्वेची अर्थव्यवस्था यामुळे डळमळीत होऊ शकते. प्रदेशाच्या ॠऊझ मध्ये 3.7 ते 6 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे, तर सुमारे 18 लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. लाखो लोकांच्या रोजगारावर संकट ओढवले आहे. तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही जगभरातील अर्थव्यवस्थांना धक्का देणारी ठरत आहे. युद्धाचे मानवी परिणाम अधिक गंभीर आहेत. लेबनॉनची राजधानी बेरूत येथे झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे नागरी भाग उद्ध्वस्त झाले आहेत. निरपराध नागरिकांचे जीव जात आहेत, हजारो लोक बेघर होत आहेत. इस्रायल आणि इराणमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती आणि असुरक्षितता ही संपूर्ण प्रदेशाला अस्थिर करत आहे. या संघर्षात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘विश्वासाचा अभाव’. आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्वास हा सर्वात मोठा भांडवल असतो. जेव्हा एक देश करार मोडतो, तेव्हा त्याचे परिणाम केवळ त्या करारापुरते मर्यादित राहत नाहीत; ते भविष्यातील सर्व चर्चांवर परिणाम करतात. आज इराण अमेरिकेवर विश्वास ठेवण्यास तयार नाही, यामागे हाच अनुभव आहे. अशा परिस्थितीत, संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. णपळींशव छरींळेपी च्या नियमांनुसार शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. परंतु, जागतिक शक्तींमधील मतभेद आणि स्वार्थी राजकारण यामुळे या प्रयत्नांना मर्यादा येतात. युद्ध हे कोणत्याही समस्येचे अंतिम समाधान नसते. ते फक्त नवीन समस्या निर्माण करते. आज मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष हा याचाच पुरावा आहे. लष्करी विजय मिळवला तरी तो तात्पुरता असतो; दीर्घकालीन शांततेसाठी संवाद आणि विश्वास आवश्यक असतो. भारतासारख्या देशांसाठीही ही परिस्थिती चिंताजनक आहे. तेलाच्या किमतीतील वाढ, जागतिक व्यापारातील अडथळे आणि परदेशात काम करणार्या भारतीय नागरिकांवरील धोका यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, भारताने संतुलित भूमिका घेत शांततेच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. शेवटी, या संपूर्ण परिस्थितीकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते-विश्वास तुटला की युद्ध अपरिहार्य होते. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव हा केवळ दोन देशांचा प्रश्न नाही, तर तो जागतिक स्थैर्याशी संबंधित आहे. जर या संघर्षाचा मार्ग संवादाकडे वळवला गेला नाही, तर त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. आज गरज आहे ती युद्धविरामाची, प्रामाणिक संवादाची आणि परस्पर विश्वास पुनर्स्थापित करण्याची. अन्यथा, विश्वासाच्या भग्नावशेषांवर उभे असलेले हे युद्ध आणखी किती काळ चालेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

COMMENTS