गेवराई : येथील एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्या आणि तिला ब्लॅकमेल करणार्या राहुल सुरेश राका या आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्याया

गेवराई : येथील एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणार्या आणि तिला ब्लॅकमेल करणार्या राहुल सुरेश राका या आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला असून आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. स्वतःच्या चुलत बहिणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे शोषण करणार्या या नराधमाला अखेर कायद्याने धडा शिकवला आहे.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की 22 एप्रिल 2017 रोजी पीडितेचे आई-वडील आणि भाऊ बाहेर गेले असल्याचे पाहून आरोपी राहुल राका याने घरात घुसून दोन्ही दरवाजे बंद केले आणि पीडितेवर जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार केला असता त्याने तिला धक्काबुक्की केली. दरम्यान पीडितेचा भाऊ अचानक घरी आल्याने आरोपी मागच्या दरवाजातून पळून गेला होता. या घटनेपूर्वी एक वर्षापासून आरोपी पीडितेला कॉलेजमधून बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार करत होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिला सतत ब्लॅकमेल करत होता. पीडितेच्या तक्रारीनंतर गेवराई पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 376 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक के. के. बोर्डे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांचा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला. सहाय्यक सरकारी वकील अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे यांनी या प्रकरणात सरकारची बाजू मांडली. त्यांचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी राहुल राका याला दोषी ठरवून ही कठोर शिक्षा सुनावली. या कामात त्यांना अॅड. शशिकांत सावंत, जिल्हा सरकारी वकील अजय राख, पोलीस निरीक्षक के. के. बोरडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता चव्हाण आणि श्रीकांत पाखरे यांनी सहकार्य केले.

COMMENTS