Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधी पक्षांच्या नेत्यांचा विरोधात असल्याचा देखावाच!

         उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उभ्या राहिलेल्या वैचारिक संघर्षाच्या पा

मंडल आयोगाने कर्नाटकात मराठा ओबीसी आणि एसटी ठरवला; महाराष्ट्रात का नाही ? 
तांत्रिकतेचा बाऊ करणारा ‘निक्काल !’
मीरा बोरवणकरांच्या पुस्तक निमित्ताने! 
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1.png

         उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उभ्या राहिलेल्या वैचारिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक विचित्र आणि विसंगत चित्र अलीकडे समोर आले. भारतीय जनता पक्षाशी निकट संबंध असलेल्या आणि शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या मोहित कंबोज यांच्या सोहळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीची. महाविकास आघाडीच्या काळात मोहित कंबोज आणि ठाकरे गट यांच्यात तीव्र संघर्ष पाहायला मिळाला होता. एकमेकांवर टोलेबाजी करणारे हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाला राज ठाकरे  यांची ही उपस्थिती होती. ही घटना केवळ राजकीय औपचारिकता म्हणून दुर्लक्षित करता येईल का, की तिच्या मागे मराठी अस्मितेच्या प्रश्नांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते?

शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नाही; ती मराठी माणसाच्या अस्मितेची, स्वाभिमानाची आणि हक्कांची लढाई म्हणून उभी राहिली. बाळासाहेब ठाकरे यांनी रुजवलेली ही विचारधारा अनेक चढ-उतारातून पुढे आली. आजच्या काळात, जेव्हा राजकीय समीकरणे सतत बदलत आहेत, तेव्हा विचारसरणीची सातत्यता आणि भूमिका स्पष्ट ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. अशा वेळी, शिवसेनेविरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या व्यक्तीच्या मंचावर ठाकरे कुटुंबातील दोन प्रमुख नेते दिसणे हे अनेकांच्या भुवया उंचावणारे आहे.

       राज ठाकरे हे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून सादर करतात. त्यांच्या भाषणांमध्ये मराठी माणसाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका दिसते. दुसरीकडे, आदित्य ठाकरे हे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करताना पर्यावरण, विकास आणि प्रगत महाराष्ट्राचा विचार मांडतात. मात्र, या दोघांनीही एका अशा मंचावर उपस्थित राहणे, जिथे त्यांच्या विचारांच्या विरोधात उभ्या असलेल्या शक्तींचे प्रतिनिधित्व होते, हे त्यांच्या भूमिकांमध्ये विसंगती दाखवते.

राजकारणात शत्रू-मित्र बदलत असतात, हे वास्तव आहे. परंतु, प्रत्येक बदलाला काही मूल्यांची चौकट असते. मराठी अस्मिता, स्थानिकांचा हक्क, आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसतो. तो एक सातत्यपूर्ण संघर्ष असतो. अशा वेळी, विरोधी विचारांच्या व्यक्तींशी सार्वजनिकरित्या मंच शेअर करणे हे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावनांशी विसंगत ठरू शकते.

        या घटनेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी संभ्रमावस्था. जे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून, विचारांसाठी लढतात, त्यांना त्यांच्या नेत्यांकडून स्पष्ट दिशादर्शन अपेक्षित असते. मात्र, जेव्हा नेतेच विरोधाभासी संकेत देतात, तेव्हा त्या चळवळीची धार बोथट होण्याचा धोका निर्माण होतो. याला काहीजण राजकीय सौजन्य किंवा वैयक्तिक संबंध म्हणूनही पाहू शकतात. पण प्रश्न असा आहे की, सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी आपल्या कृतींचा व्यापक परिणाम लक्षात घेतला पाहिजे. विशेषतः, जेव्हा त्या कृतींमुळे त्यांच्या मूळ विचारसरणीवरच प्रश्न निर्माण होतात. आज महाराष्ट्राच्या राजकारणाला स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि विचारसरणीची बांधिलकी आवश्यक आहे. व्यक्तीपेक्षा विचार मोठा असतो, आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी तडजोडी कराव्या लागतात, हे जरी खरे असले तरी त्या तडजोडींची मर्यादा असते. ती ओलांडली गेली, तर ती केवळ राजकीय चाल राहत नाही; ती विश्वासघातासारखी भासू लागते.

म्हणूनच, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. अन्यथा, मराठी माणसाच्या अस्मितेच्या नावावर उभ्या राहिलेल्या राजकारणाला ही घटना एक मोठा धक्का ठरू शकते. विश्वास हा राजकारणातील सर्वात मोठा भांडवल असतो. तो एकदा ढासळला, तर पुन्हा उभा करणे अत्यंत कठीण असते.

     खरेतर, सामान्य जनतेला मूर्ख बनविण्याचा कार्यक्रम एकंदरीत राजकारणी करित असतात का? असा प्रश्न पडतो. जर, विरोधाच्या राजकारणाचा केवळ देखावा करायचा असेल तर, लोकांची फसवणूक थांबवा आणि तुम्ही गळाभेट पाहा घेत रहा!

COMMENTS